अनधिकृत टॅंकर भरणा केंद्रही केले बंद ठाणे महापालिकेची कारवाई

ठाणे (02) : ठाणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने बुधवारी दिवा – आगासन भागात २४ अनधिकृत नळ जोडण्या खंडित केल्या. तसेच, याच भागात सुरू असलेले अनधिकृत टॅंकर भरणा केंद्रही तत्काळ बंद करण्यात आले. ही कारवाई आणि तपासणी मोहीम सुरूच राहणार आहे.
महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी अनधिकृत नळ जोडण्यांविरोधात कडक कारवाई करण्याचे निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे आणि नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी दिवा-आगासन भागातील अनधिकृत नळ जोडण्या खंडित करण्याची कारवाई करण्यात आली. याच भागात सुरू असलेल्या अनधिकृत टॅंकर भरणा केंद्राचा पंप, पाईपलाईन जप्त करण्यात आली. तसेच, अनधिकृत टॅंकर भरणा केंद्र बंद करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांत तक्रार नोंदवण्यात येत असल्याची माहिती उपनगर अभियंता विनोद पवार यांनी दिली.
टाक्या, मोटर पंप जप्त करण्यात आले. ही कारवाई परिमंडळ उपायुक्त मनीष जोशी, उपायुक्त (अतिक्रमण) शंकर पाटोळे, उपनगर अभियंता विनोद पवार, कार्यकारी अभियंता शशिकांत साळुंके, प्रशांत फिरके यांच्या उपस्थितीत मुंब्रा-दिवा प्रभाग समितीचा अतिक्रमण विभाग आणि पाणी पुरवठा विभाग यांनी संयुक्तपणेही कारवाई केली.