
प्लास्टिकमुळे पर्यावरणाला आणि मानवी जीवनाला पोहचणारा धोका लक्षात घेऊन एकल वापर प्लास्टिकचा वापर थांबविण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सातत्याने जनजागृती करण्यात येत आहे. या अंतर्गत महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जनजागृतीप्रमाणेच दुकाने व व्यवसायाच्या ठिकाणी प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहीमा राबवून विभाग कार्यालयातील तसेच परिमंडळ कार्यालयातील विशेष पथकांव्दारे नियमितपणे तपासणी करण्यात येत असते. या तपासणीमध्ये प्लास्टिक पिशव्या अथवा एकल वापर प्लास्टिक वस्तू आढळल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येते व एकल वापरातील प्लास्टिकचे साहित्य जप्त करण्यात येते.
या अंतर्गत जानेवारी 2025 पासून नोव्हेंबर 2025 पर्यंत 11 महिन्यांत रू. 20 लक्ष 65 हजार इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आलेली असून 2146. 970 कि.ग्रॅ. प्रतिबंधात्मक प्लास्टिक जप्त करण्यात आलेले आहे.
- जानेवारी 2025 मध्ये 33 आस्थापनांवर कारवाई करीत 1 लक्ष 65 हजार दंडात्मक वसूली व 62.800 कि.ग्रॅ. प्रतिबंधात्मक प्लास्टिक जप्त करण्यात आले.
- फेब्रुवारी 2025 महिन्यात 39 आस्थापनांवरील कारवाईत 1 लक्ष 95 हजार दंडात्मक वसूली व 123.600 कि.ग्रॅ. प्रतिबंधात्मक प्लास्टिक जप्त करण्यात आले.
- मार्च 2025 महिन्यात 65 आस्थापनांवर कारवाईमध्ये 3 लक्ष 25 हजार दंडात्मक वसूली व 430.120 कि.ग्रॅ. प्रतिबंधात्मक प्लास्टिक जप्त करण्यात आले.
- एप्रिल 2025 महिन्यात 27 आस्थापनांवरील कारवाईत 1 लक्ष 35 हजार दंडात्मक वसूली व 398.300 कि.ग्रॅ. प्रतिबंधात्मक प्लास्टिक जप्त करण्यात आले.
- मे 2025 महिन्यात 32 आस्थापनांवरील कारवाईत 1 लक्ष 60 हजार दंडात्मक वसूली व 113.500 कि.ग्रॅ. प्रतिबंधात्मक प्लास्टिक जप्त करण्यात आले.
- जून 2025 महिन्यात 44 आस्थापनांवरील कारवाईत 2 लक्ष 25 हजार दंडात्मक वसूली व 252.550 कि.ग्रॅ. प्रतिबंधात्मक प्लास्टिक जप्त करण्यात आले.
- जुलै 2025 महिन्यात 85 आस्थापनांवरील कारवाईत 4 लक्ष 25 हजार दंडात्मक वसूली व 176.200 कि.ग्रॅ. प्रतिबंधात्मक प्लास्टिक जप्त करण्यात आले.
- ऑगस्ट 2025 महिन्यात 14 आस्थापनांवरील कारवाईत 70 हजार दंडात्मक वसूली व 374.700 कि.ग्रॅ. प्रतिबंधात्मक प्लास्टिक जप्त करण्यात आले.
- सप्टेंबर 2025 महिन्यात 33 आस्थापनांवरील कारवाईत 1 लक्ष 65 हजार दंडात्मक वसूली व 88.900 कि.ग्रॅ. प्रतिबंधात्मक प्लास्टिक जप्त करण्यात आले.
- ऑक्टोबर 2025 महिन्यात 5 आस्थापनांवरील कारवाईत 25 हजार दंडात्मक वसूली व 6.700 कि.ग्रॅ. प्रतिबंधात्मक प्लास्टिक जप्त करण्यात आले.
- नोव्हेंबर 2025 महिन्यात 35 आस्थापनांवरील कारवाईत 1 लक्ष 75 हजार दंडात्मक वसूली व 119.600 कि.ग्रॅ. प्रतिबंधात्मक प्लास्टिक जप्त करण्यात आले.
अशाप्रकारे जानेवारी 2025 पासून 11 महिन्यांत एकूण रू. 20.65 लक्ष दंडवसूली करण्यात आली असून 2146.970 कि.ग्रॅ. एकल वापराचे प्लास्टिक जप्त करण्यात आलेले आहे.
एकल वापर प्लास्टिक व त्यातही मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणा-या प्लास्टिक पिशव्यांचा वापर नागरिकांनी टाळावा याकरिता महानगरपालिकेच्या वतीने विविध माध्यमांतून जनजागृती करण्यात येत असून त्यासोबतच प्लास्टिक प्रतिबंधाची अंमलबजावणी तपासणीसाठी विशेष मोहीमाही राबविण्यात येत आहेत. याकरिता विभागनिहाय 8 तसेच परिमंडळनिहाय 2 अशी 10 विशेष पथके तैनात आहेत. त्यांच्यामार्फत विविध आस्थापनांची तपासणी करण्यात येऊन एकल वापर प्लास्टिकचा उपयोग होत असल्याचे आढळल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. यामागे दंडवसूली ही भूमिका नसून प्लास्टिकचा वापर थांबावा हे उद्दिष्ट आहे.
तरी प्लास्टिकमुळे निसर्गाला व मानवी जीवनाला पोहचणारा धोका लक्षात घेऊन नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने प्लास्टिक पिशव्यांचा वापर पूर्णत: टाळावा व कापडी /कागदी पिशव्यांचा पर्याय निवडावा तसेच व्यावसायिकांनीही आपल्या वस्तू देण्यासाठी प्लास्टिक पिशव्या देऊ नयेत व प्लास्टिक पिशव्या दुकानात ठेवूच नयेत आणि इतर एकल वापर प्रकारातील प्लास्टिकच्या वस्तूही वापरू नयेत असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.