
ठाणे, दि. 10 : ‘गांजा’ सारख्या अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी फिरत असलेल्या दोघांना अटक करण्यात ठाणे ग्रामीण पोलिसांनी मोठे यश मिळवले आहे. अंमली पदार्थ विक्रीबाबत मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर ठाणे ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई करून 4 किलो 52 ग्रॅम वजनाच्या रु. 1 लाख 20 हजार किंमतीच्या गांज्यासह दोघांना अटक केली. अशी माहिती ठाणे ग्रामीण पोलीसांनी दिली आहे.
ठाणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक डि. एस. स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली व अपर पोलिस अधीक्षक अमोल मित्तल यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप गिते यांच्या नेतृत्वाखालील पथकाने हा सापळा रचला.
5 डिसेंबर 2025 रोजी रात्री 8.30 वाजता पथकाला माहिती मिळाली की दोन इसम मुंबई-नाशिक मार्गावर अंमली पदार्थांची विक्री करण्याच्या तयारीत आहेत. त्यानुसार पोलिसांनी शहापूर तालुक्यातील गोलभन गावाच्या हद्दीतील डायमंड हॉटेलसमोर सापळा रचून आसीफ गणी शेख उर्फ पिंजारी (वय 40, रा. सावंत पार्क, शहापूर) आणि विपुल कृष्णा मोरे (वय 30, रा. विघ्नहर्ता बिल्डिंग, शहापूर) यांची धरपकड केली. पोलिसांनी दोघांकडून पांढऱ्या रंगाचे टाटा सफारी वाहन (क्रमांक MH-15-CT-5555) तसेच 1 लाख 20 हजार रुपये किंमतीचा एकूण 4 किलो 52 ग्रॅम गांजा असा मुद्देमाल जप्त केला. आरोपी ही सामग्री विक्रीसाठी आणत असल्याचे चौकशीत उघड झाले. सदर प्रकरणी शहापूर पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक 406/2025 गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 चे कलम 8(क), 20(ब)(ii) 29 अंतर्गत गुन्हा नोंदवून आरोपींना अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलिस उप निरिक्षक महेश कदम, पो.हवा. संतोष सुर्वे, पो.उपनिरीक्षक दीपक किणी, पो.हवा. सतीश कोळी, पो.शि. स्वपनिल बोडके यांच्यासह ठाणे ग्रामीण पोलीस गुन्हे शाखेच्या पथकाने केली. पोलिस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे ग्रामीण पोलिसांकडून अंमली पदार्थांच्या विरोधात सुरू असलेल्या मोहीमेला या कारवाईमुळे मोठे यश मिळाले आहे.