
ठाणे,दि.10 : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे-4 मार्फत राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी ‘राष्ट्रीय माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा’ (NMMS) इयत्ता 8 वी साठी रविवार, दि. 28 डिसेंबर 2025 रोजी राज्यभर परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. ही परीक्षा महाराष्ट्रात एकूण 758 केंद्रावर घेण्यात येणार असून, या परीक्षेसाठी राज्यभरातून एकूण 13 हजार 789 शाळा व एकूण 2 लाख 50 हजार 544 विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात आलेली आहे.
परीक्षेसाठी प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे शाळांना परिषदेच्या www.mscepune.in व https://mscenmms.in या संकेतस्थळांवर शाळा लॉगिन या विकल्पावर दि.10 डिसेंबर 2025 पासून उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. ही प्रवेशपत्रे विद्यार्थ्यांस उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांची असेल. या प्रवेशपत्रात विद्यार्थ्यांचे नाव, वडीलांचे नाव, आडनाव, आईचे नाव यामधील स्पेलिंग दुरुस्ती असल्यास तसेच जन्मतारीख, जात, आधारकार्ड इत्यादींमध्ये दुरुस्ती असल्यास या दुरुस्ती करण्यासाठी दि.27 डिसेंबर 2025 पर्यंत संबंधित शाळेच्या लॉगिनमध्ये ऑनलाईन अर्ज उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. (कोणत्याही परिस्थितीत पूर्ण नावात बदल केला जाणार नाही.)
ऑनलाईन आलेल्या अर्जा व्यतिरिक्त कोणत्याही पद्धतीने पाठविलेल्या दुरुस्त्या (टपाल, समक्ष अथवा ईमेलद्वारे) तसेच विहित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या दुरुस्त्या /अर्जांचा विचार केला जाणार नाही. या दुरुस्त्या परीक्षा झाल्यानंतर करण्यात येणार आहेत, असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणेचे आयुक्त अनुराधा ओक यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे