
ठाणे (दि.02) : महामानव, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, ठाणे यांच्यामार्फत समता पंधरवडा निमित्त जात प्रमाणपत्र पडताळणी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.
अर्जदार/विद्यार्थी यांना जात वैधता प्रमाणपत्राची कार्यपध्दती व जात वैधता प्रमाणपत्रासाठी आवश्यक असणारे कागदोपत्री पुराव्यांबाबत जागृकता/माहिती नसल्याने व विहित कालावधीमध्ये संबंधित समितीकडे अर्ज सादर न केल्यामुळे मागासवर्गीय व्यक्तीस शिक्षण, सेवा, निवडणूक व इतर संविधानिक आरक्षणाच्या लाभापासून वंचित रहावे लागते.
यास्तव जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, ठाणे या कार्यालयाच्या वतीने समता पंधरवड्याचे औचित्य साधून दि.4 एप्रिल 2025 रोजी विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी ज्या विद्यार्थ्यांनी जात प्रमाणपत्र पडताळणी करण्याकरिता जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, ठाणे कार्यालयात अर्ज केले आहेत व त्यांना त्रुटीची पुर्तता करण्याबाबत समिती मार्फत दूरध्वनी, SMS व त्रुटीची पत्रे प्राप्त झालेली आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांनी दि.4 एप्रिल 2025 रोजी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, ठाणे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, 3 रा मजला, दत्तवाडी बस स्टॉप जवळ, खारेगांव, कळवा, ठाणे येथे त्रुटी पुर्ततेसह सकाळी 11.00 वाजता उपस्थित राहावे, असे अवाहन संशोधन अधिकारी तथा जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य सचिव प्रसाद खैरनार यांनी केले आहे.