
कल्याण, ता. 10 : कल्याण–डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण पूर्व आणि कल्याण पश्चिम येथे घेतलेल्या दोन जाहीर सभांत विरोधकांवर तीव्र शब्दांत हल्ला चढवला. उबाठा प्रमुखांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका करताना शिंदे म्हणाले की, सत्तेसाठी आणि खुर्चीसाठी काही लोकांनी बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी प्रतारणा केली असून सरड्यालाही लाज वाटेल असे रंग बदलले आहेत. जनतेला हे सर्व स्पष्टपणे दिसत असून अशा दुटप्पी भूमिकेला योग्य वेळी उत्तर मिळेल, असा इशाराही त्यांनी दिला.
एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीवर जोरदार टीका केली. “ही करप्शन आणि कन्फ्युजनची युती आहे. गोंधळलेल्या आणि दिशाहीन लोकांचीच ही युती आहे. त्यांच्या युतीत काहीतरी ‘केमिकल लोचा’ झाला आहे,” अशी खरमरी टीका त्यांनी केली.
कल्याण–डोंबिवली महापालिकेत मोठ्या प्रमाणावर जागा बिनविरोध झाल्याने विरोधक अस्वस्थ झाले आहेत, असे सांगत शिंदे म्हणाले, “तुमच्याकडे लढवायला उमेदवारच नाहीत, त्यात आमचा काय दोष?” जिंकले की निवडणूक आयोग, ईव्हीएम आणि मतदारयादी सगळे चांगले वाटतात आणि हरले की त्यावरच आरोप केले जातात, ही विरोधकांची दुटप्पी भूमिका असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले. जनता जनार्दन सर्व काही जाणते आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेते, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

दोन्ही सभांत ‘लाडकी बहिण’ योजनेचा उल्लेख करत शिंदे यांनी सांगितले की, या योजनेमुळे महिलांच्या खात्यात दरवर्षी सुमारे ४५ हजार कोटी रुपये थेट जमा होत असून महिलांना आर्थिक स्वावलंबन व आत्मसन्मान मिळत आहे. महिलांना स्वतःच्या सहीने पैसे काढण्याचा अधिकार मिळाला असून ही योजना कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही, असे त्यांनी ठामपणे स्पष्ट केले. लाडक्या बहिणींचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असल्यामुळे आपण कोणालाही घाबरत नसल्याचे शिंदे यांनी सांगितले.
कल्याण पूर्व आणि पश्चिम परिसरात झालेल्या व सुरू असलेल्या विकासकामांचा सविस्तर आढावा घेताना शिंदे यांनी मेट्रो प्रकल्प, उन्नत मार्ग, खाडी पूल, ऐरोली–काटई नाका उन्नत मार्ग, अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत कल्याण रेल्वेस्थानकाचे आधुनिकीकरण, तसेच क्लस्टर डेव्हलपमेंटद्वारे धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाचा उल्लेख केला. कर्करोग रुग्णालय, जागतिक दर्जाचे क्रीडा संकुल, टाटा टेक्नॉलॉजीज स्किल सेंटरसारखे प्रकल्प शहराच्या विकासाला नवी दिशा देत असल्याचे त्यांनी सांगितले.

कल्याण–डोंबिवलीच्या विकासासाठी शेकडो कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले. विरोधकांवर टीका करताना शिंदे म्हणाले की, काही लोक घरबसल्या किंवा फेसबुक लाईव्हवरून सरकार चालवत असल्याचा दावा करतात, मात्र आम्ही रस्त्यावर उतरून लोकांच्या समस्या सोडवतो. आमचा डोळा तिजोरीवर नसून विकासावर आहे. टीकेला आरोपांनी नव्हे तर कामाने उत्तर देण्याची आमची भूमिका आहे, असे त्यांनी ठासून सांगितले.

येत्या १५ तारखेला होणाऱ्या महापालिका निवडणुकीत मतदारांनी धनुष्यबाण आणि कमळासमोरचे बटन दाबून शिवसेना–भाजपा महायुतीला विजयी करावे, असे आवाहन करत शिंदे यांनी १६ तारखेला विजयाचा गुलाल उधळला जाईल, असा विश्वास व्यक्त केला. कल्याण–डोंबिवली महापालिकेवर महायुतीचाच भगवा फडकणार, असा ठाम दावा करत त्यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.
यावेळी कल्याण डोंबिवलीचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि शिवसेना आणि भाजप महायुतीचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि उमेदवार उपस्थित होते.