
ठाणे (08) ठाणे महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी स्वीप (SVEEP) उपक्रमांतर्गत शहरातील विविध प्रभाग समित्यांमध्ये व्यापक मतदार जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येत आहेत.
लोकमान्य सावरकर प्रभाग समिती अंतर्गत बुधवारी यशोधन इंग्लिश स्कूल यांच्या वतीने चैती नगर विभागात भव्य मतदार जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. ही रॅली शास्त्री नगर चौक ते शाळा या मार्गावर काढण्यात आली. या रॅलीत शाळेच्या मुख्याध्यापक, शिक्षकवर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. “प्रत्येक नागरिकाने मतदान करावे” असा संदेश विद्यार्थ्यांनी घोषणांच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचविला.
वागळे प्रभाग समिती अंतर्गत प्रभाग क्रमांक 16, 17 व 18 मधील शांतीनगर, श्रीनगर, रामनगर, डिसोजावाडी व शिवाजीनगर येथील शाळांमध्ये चित्रकला स्पर्धा आयोजित करून मतदान जनजागृती करण्यात आली.तसेच स्वीप पथकाने आरोग्य केंद्रांना भेट देत नागरिकांना मतदानाचे महत्त्व समजावून सांगत जनजागृती केली.
तसेच उथळसर प्रभाग समिती अंतर्गत निवडणूक निर्णय अधिकारी उर्मिला पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मतदानाचा टक्का वाढविण्याच्या उद्देशाने विविध प्रबोधनात्मक कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. या अभियानाचा भाग म्हणून ठाणे महानगरपालिकेच्या विशेष पथनाट्य पथकाने उथळसर प्रभागातील रायगड आळी, गोकुळनगर, कोलबाड, चंदनवाडी येथील मुख्य चौक तसेच शाळा क्रमांक 07 येथे प्रभावी पथनाट्य सादर केले.या पथनाट्यातून मतदान न करण्याचे दुष्परिणाम, लोकशाहीतील मतदानाचे महत्त्व व नागरिकांची जबाबदारी यावर प्रभावी संदेश देण्यात आला.