
ठाणे (05) – ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025–26 च्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रावर नियुक्त करण्यात येणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांचे प्रशिक्षण घेण्यात आले होते, परंतु या पहिल्या प्रशिक्षणास अनुपस्थित राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सौरभ राव यांनी कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश दिले होते. या नोटीसी प्राप्त होताच संबंधित कर्मचारी दुसऱ्या प्रशिक्षणाचे आदेश घेण्यासाठी महापालिकेत स्थापन करण्यात आलेल्या निवडणूक आस्थापना विभागात हजर झाले आहे.
निवडणूक प्रक्रिया सुरळीत, पारदर्शक व कायदेशीर पद्धतीने पार पाडण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण अत्यावश्यक असून, पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षण 27 ते 29 डिसेंबर 2025 या कालावधीत राम गणेश गडकरी रंगायतन व डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे आयोजित करण्यात आले होते. मात्र या पहिल्या प्रशिक्षणास काही कर्मचारी अनुपस्थित राहिल्याचे निदर्शनास आले होते. याची गंभीर दखल घेत महानगरपालिका प्रशासनाने गैरहजर कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस तसेच निवडणूक कर्तव्यात कसूर करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा दिला होता. पहिल्या प्रशिक्षणानंतर अनुपस्थितांना नोटीस बजावण्याची कार्यवाही सुरू झाल्यानंतर अनुपस्थित कर्मचाऱ्यांनी महापालिकेत येऊन आपला आदेश स्वीकारला असल्याचे संबंधित विभागाकडून सांगण्यात आले.
मतदान केंद्रावरील दुसऱे व तिसरे प्रशिक्षण प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या स्तरावर आयोजित केले जाणार आहे. मतदानाच्या पार्श्वभूमीवर कोणताही निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नसून, सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी निवडणूक कर्तव्य गांभीर्याने पार पाडावे, असे आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सौरभ राव यांनी नमूद केले आहे.