
ठाणे, प्रतिनिधी| ठाणे महापालिका निवडणुकीचे तिकिट वाटप होऊन उमेदवारांचा प्रचार शिगेला पोहचला असुन मतांच्या बेगमीसाठी राजकिय पक्षांची लगबग सुरू आहे. असे असताना भारतीय जनता पार्टीमध्ये मात्र इनकमिंग सुरूच आहे. ठाण्यातील शिवसेनेचा गड मानल्या जाणाऱ्या टेंभी नाक्याजवळील बाजारपेठ भागातील भारतीय विद्यार्थी सेनेचे माजी जिल्हाप्रमुख राजु ढमाले, श्रद्धा ढमाले यांच्यासह शेकडो शिवसैनिकांनी भाजपमध्ये जाहिर प्रवेश केला. ऐन निवडणुकीच्या धामधुमीत प्रत्येक मत महत्वाचे असताना ढमाले गटाने भाजपमध्ये प्रवेश केल्याने ठाकरे गटाला धक्का बसला आहे.
ठाण्यातील वर्तकनगर येथील भाजप विभागीय कार्यालयात बुधवारी दुपारी हा पक्ष प्रवेश सोहळा भाजपचे जनसेवक आमदार संजय केळकर आणि आमदार निरंजन डावखरे, जिल्हाध्यक्ष संदीप लेले यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी ठाणे मुख्य बाजारपेठ प्रभाग क्रमांक २२ मधील दिवंगत सेना नेते विलास ढमाले यांचे बंधु भारतीय विद्यार्थी सेनेचे माजी जिल्हा प्रमुख राजु ढमाले, श्रद्धा ढमाले, रुपेश जैन , हेमंत कासार, निलेश जोशी, लालबहादुर सिंह, जयेश जैन, विकास गुप्ता, सुनिल टिपे, राकेश सिंह, मंगलु वर्मा, विजय सिंह, गिता राठोड, शितल जैन, अशोक पटेल आदींसह अनेकांनी भाजपचे कमळ हाती धरले. आ.केळकर आणि आ. डावखरे यांनी सर्वाचे भाजपमध्ये स्वागत केले. यावेळी राजु ढमाले व त्यांच्या सहकाऱ्यांनी संपुर्ण ठाणे शहरात कमळ फुलवण्याचा निर्धार व्यक्त केला