
निवडणूक विषयक स्वीप कार्यक्रमांतर्गत प्रत्येक नागरिकाने आपला मतदानाचा हक्क बजावावा या करिता मोठया प्रमाणावर जनजागृती करण्यात येत असून यामध्ये यावर्षी पहिल्यांदाच बहुसदस्यीय पॅनल पध्दतीने मतदान होणार असल्याने 1 ते 27 प्रभागामध्ये 4 जागांसाठी तसेच 28 व्या प्रभागात 3 जागांसाठी स्वतंत्र मतदान करण्याबाबतही माहिती प्रसारित करण्यात येत आहे.
मतदानाविषयी जनजागृतीमध्ये वेगवेगळ्या माध्यमांचा वापर करुन विविध समाज घटकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला जात असून या अनुषंगाने नवी मुंबईतील कचरावेचक महिलांना एकत्र करुन त्यांना मतदानाचे महत्व पटवून देण्यात आले व पॅनल पध्दतीमध्ये करावयाच्या मतदानाची माहिती देण्यात आली. से.14 कोपरखैरणे येथील निसर्गोद्यानात उपस्थित 125 हून अधिक कचरा वेचक महिलांमध्ये मतदानाविषयक जनजागृती करण्यात आली. यावेळी नवी मुंबई स्वयंसेवी संस्थेच्या प्रमुख प्रा.वृषाली मगदूम यांनीही उपस्थित महिलांना संविधानाने दिलेला मतदानाचा हक्क स्वत: तसेच त्यांच्या कुटूंबियांनीही बजावावा याबाबत आवाहन केले.