
मुख्य निवडणूक निरीक्षक पी. वेलरासू व निवडणूक निरीक्षक समीक्षा चंद्राकार यांनी घेतला निवडणुकीच्या कामकाजाचा सखोल आढावा
ठाणे 09 – आगामी ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, शांततापूर्ण व सुरळीत पार पडावी, यासाठी मुख्य निवडणूक निरीक्षक पी. वेलरासू तसेच निवडणूक निरीक्षक समीक्षा चंद्राकार यांनी ठाणे महानगरपालिकेतील निवडणूक कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. तसेच प्रशासनाच्या निवडणूक तयारीबाबत समाधान व्यक्त करत, निष्पक्ष, मुक्त व पारदर्शक निवडणूक पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे,असे निर्देश दिले.
यावेळी आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सौरभ राव, पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे,अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, उपायुक्त निवडणूक उमेश बिरारी, जी.जी. गोदेपुरे, मनीष जोशी, दिनेश तायडे, अनघा कदम, डॉ. मिताली संचेती, सर्व निवडणूक निर्णय अधिकारी, पोलीस विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
या आढावा बैठकीदरम्यान निवडणुकीशी संबंधित मतदार यादी, मतदान केंद्रांची तयारी, ईव्हीएम व , स्ट्राँग रूम सुरक्षा, निवडणूक कर्मचारी नियुक्ती, प्रशिक्षण, टपाली मतदान, आदर्श आचारसंहिता अंमलबजावणी आदी सर्व महत्त्वाच्या मुद्द्यांवर सखोल चर्चा करण्यात आली.
निरीक्षकांनी संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदान केंद्रांबाबत माहिती घेत पोलीस बंदोबस्त, सीसीटीव्ही यंत्रणा, वेबकास्टिंग, चेकनाके व फ्लाइंग स्क्वॉड्स यांच्या कार्यपद्धतीचा आढावा घेतला. मतदानाच्या दिवशी कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी दक्षता वाढविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
ईव्हीएम मशीनचे कमिशनिंग, सीलिंग व सुरक्षित साठवणूक याबाबत सविस्तर माहिती घेण्यात आली. स्ट्राँग रूमवर २४ तास सुरक्षा, प्रवेश नोंदणी व सीसीटीव्ही निरीक्षण काटेकोरपणे राबवावे, असे निर्देश देण्यात आले. मतमोजणी प्रक्रियेतील नियोजन, मनुष्यबळ व वाहतूक व्यवस्थेचाही आढावा घेण्यात आला.
आदर्श आचारसंहितेच्या उल्लंघनाबाबत प्राप्त तक्रारींची वेळेत चौकशी व कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तक्रार निवारण यंत्रणा अधिक प्रभावी ठेवण्यावर निरीक्षकांनी भर दिला.
एकूणच ठाणे महानगरपालिका प्रशासन निवडणुकीसाठी सज्ज असल्याबाबत निवडणूक निरीक्षकांनी समाधान व्यक्त करीत कामकाजासाठी शुभेच्छा दिल्या.