
ठाणे (05) : ठाणे महानगरपालिकेच्या वतीने रेल्वे स्थानक परिसरात भव्य ‘डीप क्लीन ड्राइव्ह’ घेण्यात आला. आगामी स्वच्छ सर्वेक्षणच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. शुक्रवारी रात्री राबविण्यात आल्यामुळे शनिवारी पहाटे रेल्वेस्थानकामध्ये प्रवेश केलेल्या प्रवाशांनी परिसर स्वच्छतेबाबत ठाणे महापालिकेचे कौतुक केले.
शुक्रवारी रात्री ठाणे स्थानक परिसर, सॅटीस पुलासह संपूर्ण परिसर पाण्याने स्वच्छ करण्यात आला. या मोहिमेचे वैशिष्ट्य म्हणजे कोपरी येथील एसटीपी (STP) प्रकल्पातील प्रक्रिया केलेले व पुर्नवापरासाठी योग्य असलेल्या पाण्याचा वापर करण्यात आला असल्याचे उपायुक्त मधुकर बोडके यांनी नमूद केले.
या महास्वच्छता मोहिमेत ठाणे महानगरपालिका प्रशासनासह टीएमटी, सार्वजनिक बांधकाम विभाग, अतिक्रमण विभाग, वाहतूक पोलीस, रेल्वे प्रशासन, पाणीपुरवठा, उद्यान तसेच शिक्षण विभाग अशा विविध यंत्रणांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सुमारे ३०० ते ३५० कर्मचारी मध्यरात्रीपर्यंत अथक परिश्रम घेत परिसर स्वच्छ करत होते.
या मोहिमेदरम्यान वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट, टीएमटी व्यवस्थापक भालचंद्र बेहरे, वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप पाटील, आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे, तसेच पंजाबराव कवळे, स्वच्छता निरिक्षक लक्ष्मण पुरी हे सुध्दा प्रत्यक्ष स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते. यावेळी स्वच्छतेची शपथ घेत आपले ठाणे शहर स्वच्छ,सुंदर ठेवण्याचा निर्धार करण्यात आला.
या ‘डीप क्लीन ड्राइव्ह’मुळे स्थानक परिसर अधिक स्वच्छ, सुरक्षित व नागरिकांसाठी सुकर झाला आहे. यावेळी स्वच्छता ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून प्रत्येक ठाणेकराचे कर्तव्य आहे, असे आवाहन यावेळी महापालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.