
ठाणे प्रतिनिधी (३ जानेवारी २०२६) – आपल्या सर्वांच्या आशीर्वाद आणि प्रेमामुळेच मी चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आलो तर एवढेच नाही राज्याचा परिवहन मंत्री म्हणून जनतेची सेवा करण्याचे भाग्य मला लाभले. आपल्या सर्वांना एकजुटीने या निवडणुकीत काम करायचे आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण ही निवडणुकीला सामोरे जात आहोत. त्यांनी आपल्यावर दाखवलेला विश्वास सार्थ करून दाखवायचा आहे, असे आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पदाधिकाऱ्यांना केले.
ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ओवळा माजिवडा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांचा मेळावा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी युवासेना कार्याध्यक्ष . पुर्वेश सरनाईक यांच्यासह विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, महिला विभागप्रमुख, विधानसभा प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपल्या पक्षाच्या उमेदवारांना निवडून आणणे ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. त्यासाठी मेहनतीने आणि एकजुटीने कामाला लागावे. पदाधिकाऱ्याला विश्वासात घेऊन प्रचाराचे काम करा. पक्ष शिस्त ही महत्त्वाची आहे, असे प्रताप सरनाईक यांनी सांगितले.
यावेळी युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांनी पदाधिकाऱ्यांना संबोधित केले. गेल्या अनेक निवडणुकीत माझ्या वडिलांवर आपण दिलेल्या प्रेम, विश्वास व आशीर्वादाबद्दल मी सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिकांचे मनःपूर्वक आभार मानतो. ही निवडणूक आपल्या कार्यकर्त्यांची, आपल्या सेवकांची आणि जनतेच्या विश्वासाची आहे. आजपासून अधिकृतपणे प्रचाराला सुरुवात करत असून एकनाथ शिंदे साहेबांनी आणि प्रताप सरनाईक साहेबांनी केलेली विकासकामे आणि जनहिताचे निर्णय मतदारांपर्यंत ताकदीने पोहोचवण्याचा संकल्प आपण सर्वांनी करूया, असे आवाहन पुर्वेश सरनाईक यांनी केले.

या प्रसंगी महायुतीचे सर्व २८ उमेदवार विजयी करण्याची एकमुखी शपथ घेण्यात आली. ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. प्रभाग क्रमांक ५ अ मधून सुलेखा चव्हाण आणि प्रभाग क्रमांक १४ अ मधून शीतल ढमाले यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल नवनिर्वाचित नगरसेविका म्हणून त्यांचे अभिनंदन करून सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी कार्य अहवाल प्रकाशित करण्यात आला.