
ठाणे (दि.16): घोडबंदर रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत घोडबंदरवासियांची वाहतूक कोंडीतून सुटका व्हावी, यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल रात्री उशिरा सर्व यंत्रणांची बैठक घेवून घोडबंदर रस्त्यावरील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने कराव्यात, असे आदेश सर्व यंत्रणांना दिले आहेत.
या पार्श्वभूमीवर घोडबंदर-गायमुख रस्त्यासह जिल्ह्यातील इतर महत्त्वाच्या रस्त्यांवरील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी आता ठाणे जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली आज ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व संबंधित विभागांची तातडीची समन्वय बैठक पार पडली.
या बैठकीत मीरा भाईंदर पोलीस आयुक्त निकीत कौशिक, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.संदीप माने, वाहतूक उपायुक्त पंकज शिरसाठ, अधीक्षक अभियंता सिद्धार्थ तांबे, ठाणे, मीरा भाईंदर, नवी मुंबई, पालघरचे वरिष्ठ पोलीस अधिकारी, प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील, महानगरपालिका, आरटीओ, एमएमआरडीए, एमएसआरडीसी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे काही अधिकारी प्रत्यक्ष तर काही अधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.
वाहतूक कोंडीच्या समस्येवर तात्काळ उपाययोजना करण्यासाठी या बैठकीत अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा झाली. जेएनपीटी आणि अहमदाबाद हायवे-पालघरकडून येणाऱ्या अवजड वाहनांसाठी पार्किंग लॉट किंवा ‘होल्डिंग प्लॉट्स’ निश्चित करण्यावर भर देण्यात आला. शहरातील मुख्य मार्गांवरून अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी विशिष्ट वेळेचे नियोजन (Time Zone) निश्चित करण्याचा निर्णय घेण्यात आला. घोडबंदर रोड, माजिवडा जंक्शन, भिवंडी बायपास, चिंचोटी, शिळफाटा आणि कल्याण बायपास यांसारख्या सतत वाहतूक कोंडी होणाऱ्या ठिकाणांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची आणि ते सुस्थितीत ठेवण्याची सूचना देण्यात आली. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्गांचा वापर, वाहतूक नियंत्रण आणि प्रवाशांचा प्रवास सुरक्षित व सुलभ होण्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यावरही भर देण्यात आला.
या बैठकीमुळे जिल्ह्यातील वाहतूक कोंडीवर लवकरच तोडगा निघेल आणि नागरिकांना सुलभ प्रवास करता येईल, यासाठी नागरिकांनीही प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले आहे.