
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
राज्यातील सर्व नगरपरिषदा व नगरपंचायतींमध्ये वैशिष्टयपूर्ण व नविन नगरपंचायत,नगरपालिका योजने अंतर्गत एक उद्यान विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी प्रत्येकी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करतानाच या उद्यानांना ‘नमो उद्यान’ नाव देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केली. यानिर्णयामुळे राज्यातील एकूण 394 नगरपरिषद आणि नगरपंचायतींमध्ये नमो उद्यान वर्षभरात विकसित करण्यात येतील. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्राने दिलेली ही भेट असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.
नव्याने विकसित झालेल्या या उद्यानांची विभागीय स्तरावर स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. त्यामाध्यमातून प्रत्येक विभागातून ३ नगरपरिषद/नगरपंचायतींना बक्षिसे देखील देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री शिंदे यांनी जाहीर केला आहे.
नमो उद्यानांच्या स्पर्धेत प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे पारितोषीक संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांना जाहिर करण्यात येतील. त्यामध्ये प्रथम क्रमांकासाठी पाच कोटी, द्वितीय तीन तर तृतीय क्रमांकासाठी एक कोटी रुपये अशी बक्षिसाची रक्कम अतिरिक्त विकास निधी म्हणून विजेत्या नगरपरिषदा आणि नगरपंचायतींना देण्यात येणार आहे.