
- महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले निर्देश
- जस्टिस फॉर घोडबंदर रोडच्या प्रतिनिधींसोबत झाली बैठक
ठाणे | घोडबंदर रोडवरील पाच वाहतूक सिग्नलपाशी प्रायोगिक तत्त्वावर रम्बलर (वेग नियंत्रक पट्ट्या) लावण्याचे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत. हा प्रयोग यशस्वी झाल्यास घोडबंदर रोडवरील सर्वच सिग्नलपाशी त्यांची अमलबजावणी करण्यात येणार आहे. सिग्नलपाशी वाहनांचा वेग कमी करून अवजड वाहने नियंत्रित करण्याची आवश्यकता असल्याचे मत जस्टिस फॉर घोडबंदर रोडच्या प्रतिनिधींनी मंगळवारी (२४ जून) झालेल्या बैठकीत मांडले. या सूचनेचा अवलंब करण्यासाठी महापालिकेचा सार्वजनिक बांधकाम विभाग आणि वाहतूक पोलीस यांनी संयुक्तपणे पाच ठिकाणांची निवड करावी. तेथे प्रायोगिक तत्त्वावर ही व्यवस्था करावी, असे निर्देश आयुक्त राव यांनी दिले. हा प्रयोग करताना वाहन चालकांना दिसेल अशा पद्धतीने त्याचा इशारा देणारी पाटी, रिफ्लेक्टर्स आदी गोष्टी शास्त्रशुद्ध पद्धतीने कराव्यात. इंडियन रोड कॉंग्रेसने निर्धारित केलेल्या सर्व मार्गदर्शक नियमांचे पालन त्यात करावे, असेही आयुक्त राव यांनी स्पष्ट केले. घोडबंदर रस्ता आणि परिसरातील नागरी कामांविषयी चर्चा करण्यासाठी जस्टिस फॉर घोडबंदर रोडच्या प्रतिनिधींसोबत बैठकीचे आयोजन महापालिका आयुक्त कार्यालय येथे करण्यात आले होते. आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, नगर रचना सहाय्यक संचालक संग्राम कानडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता सिद्धार्थ तांबे, पोलीस उपायुक्त (वाहतूक) पंकज शिरसाट, उपनगर अभियंता विकास ढोले, सुधीर गायकवाड, शुभांगी केसवानी, घोडबंदर रोडचे समन्वय अधिकारी आणि कार्यकारी अभियंता संजय कदम यांच्यासह एमएमआरडीए, मेट्रो यांचे अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत, वाघबीळ येथील अंतर्गत रस्ता, भाईंदरपाडा आणि साईनगर येथील सेवा रस्ता, रोझा गार्डिनिया येथील प्रस्तावित वाहतूक बेट आदी विषय प्रतिनिधींनी मांडले. त्यावर, कालबद्ध कार्यक्रम घेऊन पूर्तता करण्याचे निर्देश आयुक्त राव यांनी संबंधित विभागांना दिले.
तसेच, रस्त्यावरील राडा रोडा, वायरी, अनावश्यक बॅरिकेड्स आदी काढून टाकरण्यासाठी महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, मेट्रो आणि एमएमआरडीए यांनी संयुक्तपणे सर्वंकष स्वच्छता मोहीम (डीप क्लिन ड्राईव्ह) घ्यावी,असेही आयुक्त राव यांनी सांगितले.
# घनकचरा समस्या, लोकसहभागाची आवश्यकता
गायमुख आणि परिसरातील कचऱ्याच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी बहुपर्यायी उपाययोजना करण्याची आवश्यकता प्रतिनिधींनी व्यक्त केली. तसेच, काही मोठ्या गृहसंकुलांनी छोटेखानी कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू करण्याची तयारी दर्शवल्याचेही या प्रतिनिधींनी सांगितले. घनकचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी व्यापक लोकसहभागाची आवश्यकता असून त्यासाठी महापालिका प्रयत्न करीत आहे, असे आयुक्त राव यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच, ज्या गृहसंकुलांनी घनकचरा व्यवस्थापनात रस दाखवला आहे, त्यांच्या पदाधिकाऱ्यांसोबत अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्याकडे बैठक आयोजित करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
# रिक्षा स्टॅण्डसाठी संयुक्त सर्वेक्षण
ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व रिक्षा थांब्यांचे वाहतूक पोलीस, परिवहन विभाग आणि महापालिका यांच्यामार्फत संयुक्त पाहणी करण्याचे या बैठकीत ठरले. रिक्षा थांब्यांच्या जागा निश्चित करून त्यांचे नियमन करण्यात येईल, असे पोलीस उपायुक्त (वाहतूक) पंकज शिरसाट यांनी सांगितले.
Author Profile
Latest entries
ताज्या बातम्याJune 30, 2025हिंदी सक्तीचा शासन निर्णय रद्द
ताज्या बातम्याJune 28, 2025शेतकऱ्यांनी खरीप हंगाम 2025 मध्ये सुधारीत प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी व्हावे
ताज्या बातम्याJune 28, 2025मुंबई महानगर क्षेत्रातील पहिल्या स्पेस एज्युकेशन लॅब’ ची निर्मितीठाण्यात’ होणार
ताज्या बातम्याJune 27, 2025घोडबंदर रोडवरील सिग्लनपाशी रम्बलर पट्ट्यांचा प्रायोगिक तत्त्वावर वापर होणार