
महानगर गॅस अधिकाऱ्यांना खासदार नरेश म्हस्के यांची तंबी
ठाणे – ठाणे शहरातील नौपाडा, राम मारुती रोड, घंटाळी, भास्कर कॉलनी आणि आजूबाजूच्या परिसरातील अनेक गृहसंकुलांमध्ये अजूनही पाईप लाईनद्वारे घरगुती गॅस जोडणी झालेली नाही. जुने ठाणे अद्याप घरगुती गॅस जोडणी पासून वंचित आहे. आज ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांनी रहिवासी आणि महानगर गॅस यांची संयुक्त बैठक घेत अधिकाऱ्यांची कानउघडणी केली. तसेच या रहिवाशांना तातडीने पाईप लाईनद्वारे घरगुती गॅस जोडणी करावी अशी तंबीच खासदार नरेश म्हस्के यांनी दिली.
जुन्या ठाण्यात घरगुती गॅस जोडणीची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. महानगर गॅस लिमिटेड (MGL) या कंपनीकडे या संदर्भात मागणी करण्यात आली, अर्ज दिले, बैठकाही घेण्यात आल्या, परंतु अद्याप ठोस कार्यवाही झालेली नाही. या भागातील नागरिकांना घरगुती गॅस ऐवजी सिलेंडरवर अवलंबून राहावे लागत आहे. या समस्येला वाचा फोडण्यासाठी आणि नागरिकांच्या मागण्या अधिक प्रभावीपणे मांडण्यासाठी शिवसेनेचे पदाधिकारी किरण नाकती, प्रकाश पायरे, बाळा गवस, संजीव कुलकर्णी यांनी पुढाकार घेतला. महानगर गॅस लिमिटेडच्या अधिकाऱ्यांशी थेट चर्चा करण्यासाठी त्यांनी आज एक विशेष बैठक आयोजित केली. ही बैठक आनंद आश्रम येथे खासदार नरेश म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
या बैठकीत महानगर गॅसचे वरिष्ठ अधिकारी, अभियंते आणि विविध गृहसंकुलांचे पदाधिकारी उपस्थित होते. नागरिकांनी आपल्या तक्रारी अत्यंत स्पष्टपणे मांडल्या. काही ठिकाणी गॅस लाईनच पोहोचलेली नाही, तर काही ठिकाणी कनेक्शनसाठी मोठ्या प्रमाणात अडथळे येत आहेत, काही सोसायट्यांमध्ये सर्व प्रक्रिया पूर्ण करून देखील जोडणी झालेली नाही, अशा रहिवाशांनी तक्रारी केल्या. या बैठकीत शिवसेनेचे किरण नाकती आणि प्रकाश पायरे यांनी अनेक सोसायटी संदर्भात समस्या मांडल्या आणि महानगर गॅस प्रशासनासमोरील अडचणी समजावून सांगितल्या.

महानगर गॅस ही एकमेव सेवा पुरवठादार कंपनी असल्यामुळे नागरिकांना दुसऱ्या कोणत्याही पर्यायाकडे जाता येत नाही. म्हणूनच या कंपनीने जबाबदारीने काम करणे अत्यावश्यक आहे. तुम्ही सरकारी मान्यतेने सेवा देत आहात, पण नागरिकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करणार असाल तर कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, अशी तंबीच खासदार नरेश म्हस्के यांनी अधिकाऱ्यांना दिली.
महानगर गॅस लिमिटेडचे वरिष्ठ अधिकारी प्रशांत कोठेगावकर यांनी तात्काळ गॅस जोडणी पूर्ण करुन कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. यावेळी विलास जोशी, भास्कर पाटील, प्रीतम रजपूत, शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते व स्थानिक नागरिक उपस्थित होते.

Author Profile
Latest entries
ताज्या बातम्याJune 30, 2025हिंदी सक्तीचा शासन निर्णय रद्द
ताज्या बातम्याJune 28, 2025शेतकऱ्यांनी खरीप हंगाम 2025 मध्ये सुधारीत प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी व्हावे
ताज्या बातम्याJune 28, 2025मुंबई महानगर क्षेत्रातील पहिल्या स्पेस एज्युकेशन लॅब’ ची निर्मितीठाण्यात’ होणार
ताज्या बातम्याJune 27, 2025घोडबंदर रोडवरील सिग्लनपाशी रम्बलर पट्ट्यांचा प्रायोगिक तत्त्वावर वापर होणार