
मराठी चित्रपटप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी!
अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर आणि अभिनेता सिद्धार्थ बोडके लव फिल्म्सच्या आगामी ‘तू आहेस ना’ या मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. नुकतेच या चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित करत चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.
माणसांमधील नातेसंबंध आणि दोन आयुष्यांना अनपेक्षितपणे जोडणाऱ्या एका अनोख्या भावनिक बंधाची हृदयस्पर्शी कहाणी या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे.
या चित्रपटात सुप्रिया पिळगावकर मध्यवर्ती भूमिकेत दिसणार असून, सिद्धार्थ बोडकेही प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. विशेष म्हणजे, ‘देवमाणूस’नंतर सिद्धार्थ बोडके यांचा लव फिल्म्ससोबतचा हा दुसरा चित्रपट आहे.
या चित्रपटासाठी आणखी एक मोठी अभिमानाची बाब म्हणजे, गोव्यात आयोजित होणाऱ्या ५७ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात इफ्फीमध्ये २६ नोव्हेंबर रोजी या चित्रपटाचा गाला प्रीमियर विभागात जागतिक प्रीमियर होणार आहे. या विभागात प्रदर्शित होणारा ‘तू आहेस ना’ हा एकमेव मराठी चित्रपट ठरणार आहे.
चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन दिपक गावडे यांनी केले असून, लव रंजन आणि अंकुर गर्ग यांनी निर्मितीची धुरा सांभाळली आहे.
दरम्यान, हा चित्रपट २०२७ मध्ये चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
भावनिक नात्यांची अनोखी गोष्ट आणि दिग्गज कलाकारांची साथ… ‘तू आहेस ना’ या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये आतापासूनच उत्सुकता निर्माण झाली आहे.
मनोरंजन विश्वातील अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी पाहत राहा…