
ठाणे : अल निनोच्या संभाव्य प्रभावामुळे राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन राज्य शासनाने उपलब्ध जलसाठ्याचे काटकसरीने आणि नियोजनबद्ध व्यवस्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. याच पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील पाणीपुरवठ्यात 10 टक्के कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या निर्णयानुसार, सोमवार, 16 नोव्हेंबर 2026 रोजी सकाळी 9 वाजल्यापासून मंगळवार, 17 नोव्हेंबर 2026 रोजी सकाळी 9 वाजेपर्यंत ठाण्यातील अनेक भागांचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. स्टेम प्राधिकरण तसेच ठाणे महानगरपालिकेच्या स्वतःच्या पाणीपुरवठा योजनेअंतर्गत हा 24 तासांचा शटडाऊन घेण्यात येणार आहे.
या पाणीबंदचा फटका घोडबंदर रोड, लोकमान्यनगर, वर्तकनगर, साकेत, ऋतूपार्क, जेल, गांधीनगर, रुस्तमजी, सिद्धांचल, इंदिरानगर, रुपादेवी, श्रीनगर, समतानगर, सिद्धेश्वर, इटरनिटी, जॉन्सन, मुंब्रा आणि कळवा या परिसरांना बसणार आहे.
विशेष म्हणजे, हा शटडाऊन केवळ एकदाच नसून यापुढे प्रत्येक सोमवारी सकाळी 9 ते मंगळवारी सकाळी 9 वाजेपर्यंत 24 तासांचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे ठाणेकरांना दर आठवड्याला पाण्याचे नियोजन करावे लागणार आहे.
दरम्यान, नागरिकांनी पाणीपुरवठा बंद होण्यापूर्वी आवश्यक पाणीसाठा करून ठेवावा, पाण्याचा अपव्यय टाळावा आणि उपलब्ध पाणी काटकसरीने वापरावे, असे आवाहन ठाणे महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
अल निनोच्या पार्श्वभूमीवर पाण्याचे संकट टाळण्यासाठी महापालिकेचा हा निर्णय असला, तरी दर सोमवारी होणाऱ्या 24 तासांच्या पाणीबंदमुळे ठाणेकरांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होण्याची शक्यता आहे.