
ठाणे : ठाकरे गटाच्या शिवसेनेचे ठाण्यातील विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणाला एक महिना पूर्ण झाला असताना, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील ठाणे जिल्हा महिला आघाडी प्रमुख मीनाक्षी शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून राजीनाम्याचा निर्णय कळवला आहे. या प्रकरणात मीनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांच्या अटकेची मागणी पूर्णेकर कुटुंबीयांकडून सातत्याने केली जात आहे. त्यामुळे मीनाक्षी शिंदे यांच्या राजीनाम्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
# आरोपांमुळे व्यथित झाल्याचे पत्रात नमूद
प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर मीनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांची चौकशी करण्यात आली होती. या प्रकरणाशी आपला संबंध नसताना आपले नाव जोडले जात असल्याचा दावा मीनाक्षी शिंदे यांनी एकनाथ शिंदे यांना लिहिलेल्या पत्रात केला आहे. समाजमाध्यमांवर तसेच राजकीय पातळीवर आपल्याविरोधात आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याने मनाला वेदना होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
आपण आजवर पक्षाचे काम पूर्ण निष्ठेने केले असून, पक्षाची किंवा पक्षनेतृत्वाची मान खाली जाईल, असे कोणतेही कृत्य केलेले नाही, अशी भूमिका त्यांनी पत्रातून मांडली आहे. ज्या प्रकरणाशी आपला संबंध नाही, त्यामध्ये आपले नाव जोडून पक्ष नेतृत्वावर दबाव निर्माण केला जात असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे.
# पक्षाची प्रतिष्ठा जपण्यासाठी राजीनामा
आपल्या निष्ठेची पावती आरोपांच्या माध्यमातून दिली जात असल्याची खंतही मीनाक्षी शिंदे यांनी पत्रात व्यक्त केली आहे. ज्या नेतृत्वाचा सन्मान जपण्यासाठी आजवर काम केले, त्याच नेतृत्वाच्या बदनामीचे कारण आपल्यामुळे व्हावे, हे सहन होत नसल्याचे त्यांनी नमूद केले.
त्यामुळे ठाणे जिल्हा महिला आघाडी प्रमुख पदाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी पत्रात स्पष्ट केले. हा निर्णय नाराजीतून घेतलेला नसून, पक्षाची प्रतिष्ठा आणि नेतृत्वाचा सन्मान जपण्यासाठी घेतल्याचेही त्यांनी म्हटले आहे. आपल्या भावनांची दखल घेतली जाईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.