
ठाणे (13) : गावदेवी भाजी मार्केट येथे 21 मे 2026 रोजी लागलेली भीषण आग विझविताना ठाणे अग्निशमन विभागातील स्थानक अधिकारी सागर शिंदे व आरक्षक काळू गाडेकर यांचा दुर्देवी मृत्यू झाला होता. या दोन्ही कर्तव्यदक्ष कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा तत्त्वावर ठाणे महानगरपालिकेच्या सेवेत तातडीने सामावून घेण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते.
या अनुषंगाने महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी प्रशासनासोबत पाठपुरावा केला होता. त्यानुसार आज स्व. सागर शिंदे यांच्या पत्नी माधुरी सागर शिंदे यांना ठाणे महापालिकेच्या सेवेत सामावून घेण्याबाबतचे नियुक्ती पत्र आज खासदार नरेश म्हस्के यांच्या उपस्थितीत महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी शिवसेना गटनेते पवन कदम, नगरसेवक दिलीप बारटक्के, नगरसेवक संजय वाघुले, नारायण पवार, अतिरिक्त आयुक्त 2 मेजर डॉ. नितीन राठोड, उपायुक्त जी.जी. गोदेपुरे, कार्मिक अधिकारी दयानंद गुंडप, मुख्य अग्निशमन अधिकारी गिरीष झळके आदी उपस्थित होते.
यापूर्वी, आरक्षक काळू गाडेकर यांचा मुलगा तेजस काळू गाडेकर याला सदर दुर्घटनेनंतर एका महिन्याच्या आत महापालिकेच्या सेवेत सामावून घेण्यात आले होते. या निर्णयामुळे दोन्ही कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला असून, प्रशासनाकडून त्यांच्या उल्लेखनीय सेवेची दखल घेण्यात आली आहे.