
एकाच विमा कंपनीकडून विमा काढण्याच्या सक्तीचा पुनर्विचार होणार!
ठाणे महापालिकेतील कंत्राटदारांना आता एकाच सरकारी विमा कंपनीकडून विमा काढण्याची सक्ती करण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार केला जाणार आहे.भाजपचे नगरसेवक नारायण पवार यांनी महासभेत हा मुद्दा उपस्थित करत प्रशासनाला धारेवर धरले. चार सरकारी विमा कंपन्या उपलब्ध असताना केवळ एकाच कंपनीकडून विमा काढण्याची सक्ती का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
यापूर्वी कंत्राटदारांना कोणत्याही सरकारी विमा कंपनीकडून विमा काढण्याची मुभा होती. मात्र, विमा संचालनालयाच्या १७ जून २०२५ रोजीच्या पत्रानुसार, ठाण्यातील नॅशनल इन्शुरन्स कंपनीच्या नौपाडा शाखेकडूनच विमा घेणे बंधनकारक करण्यात आले होते.
मात्र, या कंपनीकडून जादा विमा दर आकारले जात असल्याचा, पॉलिसी नोंदणीमध्ये चुका होत असल्याचा आणि शनिवार-रविवारी योग्य सेवा मिळत नसल्याचा आरोप कंत्राटदारांकडून करण्यात येत होता. या प्रकरणी नगरसेवक नारायण पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही पत्राद्वारे तक्रार केली होती.
दरम्यान, महापालिकेच्या महासभेत हा मुद्दा पुन्हा उपस्थित करत नारायण पवार यांनी विमासक्तीचा निर्णय रद्द करण्याची मागणी केली.त्यावर प्रशासनाच्या वतीने उपायुक्त गजानन गोदेपुरे यांनी या निर्णयाचा पुनर्विचार करण्याचे आश्वासन दिले.
त्यामुळे आता ठाणे महापालिकेच्या कंत्राटदारांना एकाच विमा कंपनीच्या सक्तीमधून दिलासा मिळणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.