ठाणे : आजच्या धकाधकीच्या जीवनात आरोग्यासाठी आहाराबरोबरच मानसिक शांती कशी मिळेल याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. यासाठी आध्यात्माची बैठक खुप महत्वाची आहे. मनाने शांत राहून समतोलपणे विचार करुन आलेल्या प्रत्येक संकटांना धैर्याने तोंड देऊन जीवन सुखी होऊ शकते, असा मंत्र अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी-मोने यांनी महिलांना दिला.
ठाण्यातील घोडबंदरस्थित पातलीपाडा येथील होरायझन प्राइम हॉस्पिटलच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून हॉस्पिटलच्या आवारात चर्चासत्राचे तसेच `जन्म ऋण' या आगामी मराठी चित्रपटातील कलाकार आणि दिग्दर्शकांच्या गप्पांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यावेळी अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी-मोने बोलत होत्या. होरायझन प्राइम हॉस्पिटलच्या सीईओ रीया वैद्य आणि ऋषिकेश वैद्य यांनी प्रमुख पाहूणे अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी -मोने, `जन्म ऋण'च्या निर्मात्या - दिग्दर्शिका कांचन अधिकारी, स्री रोगतज्ञ डॉक्टरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी हॉस्पिटलच्या स्टाफने `बाई पण भारी देवा' या गाण्याचे सादरीकरण केले तेव्हा अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी-मोने यांनीही गाण्यावर ठेका धरला.
महिला पुढे जात आहेत, प्रगती करत असल्याचे पाहून छान वाटत आहे. ती अबला कधीच नव्हती ती सबला होती पण याची जाणीव आता सगळ्यांना होत आहे. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्री उभी असते. आता मात्र चित्र उलटे व्हायला लागले आहे आणि ते चांगले आहे असे मत अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी -मोने यांनी व्यक्त केले.
वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये महिला आज पुढे जात आहेत. अविरत काम करत आहेत. घर, संसारही सांभाळत आहेत. तारेवरची कसरत हळूहळू ती सोपी करत चाललेली आहे. घरच्यांचा पाठिंबा मिळत आहे. स्वत:चा आनंद स्वत: शोधायला शिका यासाठी दुसऱ्यावर अवलंबून राहू नका. आपल्याला इंडिपेडंट व्हायचे आहे तर प्रत्येक दृष्टीने व्हायला हवे. आर्थिकबाबी नवरा आणि मुलगा बघत आहे म्हणून दुर्लक्ष न करता गुंतवणूक कोठे होते आहे याकडे लक्ष द्या. ती कशी वाढवू शकते हे पहा. मुले मोठी होत आहेत तेव्हा त्यांना अडकवून ठेवू नका. त्यांना त्यांचे आयुष्य जगू द्या आणि आपण आपले आयुष्य जगा. कारण नाळ ही कधीच तुटत नसते. तो प्रेम आणि आनंद राहत असल्याचे सुकन्या कुलकर्णी-मोने यांनी सांगितले.
आज सर्वच क्षेत्रात महिला एका उंचीवर पोहोचल्या आहेत. मात्र तरीही त्यांना घरात दुय्यम वागणूक दिली जात आहे. घरातील माणसांनी त्यांचा आदर, सत्कार करायला हवा. तसेच जोपर्यंत महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण कमी होत नाही आणि त्यातून महिलांची सुटका होत नाही तो पर्यंत खऱ्या अर्थाने महिला दिन साजरा करण्यासाठी सज्ज झालो आहोत असे मला वाटत नाही, अशी खंत निर्मात्या - दिग्दर्शिका कांचन अधिकारी यांनी व्यक्त केली. येणाऱ्या काळात अनिष्ट गोष्टींचे प्रमाण निश्चित कमी होईल आणि महिलांची अजून प्रगती होईल असा आशावादही कांचन अधिकारी यांनी व्यक्त केला. महिला दिनानिमित्त आयोजित आरोग्य मार्गदर्शन शिबिरात होरायझन प्राइम हॉस्पिटलच्या सीईओ रीया वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली स्त्री रोग तज्ञांच्या टीमने उपस्थितांना मार्गदर्शन करत प्रश्नांचे निरसन केले