
- ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी स्वाक्षरी करून केले उद्घाटन
- जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी केली स्वाक्षरी
- अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी आणि प्रशांत रोडे यांनीही केली स्वाक्षरी
ठाणे स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर देशभर सुरू असलेल्या घरोघरी तिरंगा २०२५ या अभियानाअंतर्गत ठाणे महापालिका मुख्यालय येथे तिरंगा प्रतिज्ञा स्वाक्षरी फलक आणि तिरंगा सेल्फी स्टॅंड उभारण्यात आला आहे. या दोन्हीचे उद्घाटन मंगळवारी सकाळी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी स्वाक्षरी करून तसेच छायाचित्र काढून केले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी आणि अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे यांनीही या तिरंगा प्रतिज्ञा स्वाक्षरी फलकावर स्वाक्षरी केली.
घरोघरी तिरंगा २०२५ या अभियानात ठाणे महापालिकेतर्फे १५ ऑगस्टपर्यंत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मॅरेथॉन स्पर्धेत तिरंगा प्रतिज्ञाही घेण्यात आली होती. तर, स्वच्छता अभियान, महापालिका शाळांतील विविध कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम यांचेही आयोजन करण्यात येत असल्याची माहिती यावेळी महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
महापालिका मु्ख्यालयातील तळमजल्यावर तिरंगा प्रतिज्ञा स्वाक्षरी फलक आणि तिरंगा सेल्फी स्टॅंड उभारण्यात आला आहे. तेथे सहाय्यक संचालक नगररचना संग्राम कानडे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी दिलीप सूर्यवंशी, उपायुक्त जी. जी. गोदेपुरे, मनीष जोशी, उमेश बिरारी यांनीही तिरंगा फलकावर स्वाक्षरी केली. तसेच, सेल्फी स्टॅण्डपाशी छायाचित्रेही काढली. त्यांच्यासोबत उपस्थित पत्रकारांनीही तिरंगा प्रतिज्ञा स्वाक्षरी फलकावर स्वाक्षरी केल्या.
