
ठाणे (08) : नर्तनातील भावतरंग, नृत्याचे लयबद्ध घुंगरू, गायनाचे स्वरमधुर सूर, हार्मोनियमच्या सुरेल कळा, तालवाद्याचा अद्वितीय झंकार.. आणि जय जय गौरीशंकर या संगीत नाटकाने भारावलेले रसिक.. वन्समोअरची दाद… अशा सांगितीक वातावरणात ठाणे महापालिका आयोजित पं. राम मराठे महोत्सवाचा अखेरचा दिवस प्रेक्षकांना एक अनोखी भेट देणारा ठरला.
ठाणे महापालिकेच्या माध्यमातून 5 ते 7 डिसेंबर 2025 या कालावधीत राम गणेश गडकरी रंगायतन येथे 30 वा संगीतभूषण पं. राम मराठे महोत्सव आयोजित केला होता. यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, उपायुक्त उमेश बिरारी, प्र. उपमाहिती जनसंपर्क अधिकारी प्राची डिंगणकर, पं. मुकुंद मराठे, पं.विवेक सोनार, ज्येष्ठ नृत्यांगना डॉ. मंजिरी देव, तबलावादक रवी नवले तसेच ठाणेकर रसिक उपस्थित होते.
समारोपाच्या दिवशीचे सकाळचे पहिले सत्र कथ्थक नृत्यांना वैशाली वैशंपायन पोतदार यांची एकल कथक नृत्याने गुंफले. गणेश वंदना, ताल प्रस्तुती आणि ठुमरी असा पारंपरिक कथक नृत्य क्रम त्यांनी सादर केला. पंडिता गुरु रोहिणी भाटे रचित गणेश वंदनेने त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर तीन तालप्रस्तुती मध्ये उठान, थाट, आमद, लयीत सादर करत प्रेक्षकांना आनंद देत वाढत्या लयीसोबत तडफदार बंदिशींची मालिका सादर केली. या वाढत्या लयीला स्वल्पविराम देत संत सोयरा बाईंचे एक अत्यंत संवेदनशील आणि सर्जनशील विषयावरील ‘ ‘देहासी विटाळ म्हणती सकळ आत्मा तो निर्मळ शुद्धबुद्ध’ हे स्त्रियांच्या वेदनेवर विठ्ठलाला प्रश्न करणारं काव्य त्यांनी सूचक आणि समर्पक अभिनयातून मांडत प्रेक्षकांची मने जिंकली. त्यांना तबला साथ प्रसाद पाध्ये यांनी, हार्मोनियमची साथ राजस खासगीवाले, अर्चना गोरे यांनी गायन साथ आणि त्यांच्या शिष्या जुई पाठक यांनी उत्तम अशी पढंत करून कार्यक्रमाची रंगत वाढविली.

संगीत जय जय गौरीशंकर नाटकाला रसिकांची गर्दी
तिसऱ्या दिवशीच्या दुपारच्या सत्रात सादर झालेल्या परस्पर सहायक मंडळ (वाघांबे) मुंबई निर्मित जय जय गौरीशंकर या संगीत नाटकाला ठाणेकर रसिकांनी रंगायतन तुडुंब भरले होते. सप्तसूर झंकारीत बोले नांदी .. प्रिय करा, सावज माझे गवसलं, ती सुंदरा, सुरगंगा मंगला, भरे मनात सुंदरा, नारायणा रमारमणा, कशी नाचे छमाछम, जय जय रमारमण श्रीरंग अशी एकाहून एक सरस गाणी युवा कलाकारांनी अप्रतिम सादर केली. कैलास पर्वतचा देखावा, नेपथ्य, प्रकाशयोजना, रंगभूषा, वेशभूषा, आणि सर्वांची उत्तम देहबोली आणि स्पष्ट उच्चारांसह संवाद त्यामुळे नाटक रसिकांच्या पसंतीस उतरले. या नाटकात शंभरपूर्वक प्रयोगात विजयाची भूमिका केलेली प्राजक्ता मराठे तिने हिने या नाटकातील तिने गाजवलेले नाट्यपद ‘प्रियकरा नसे हा छंद बरा..’ हे पद वन्समोर सह सादर करून पंडित राम मराठे ह्यांच्या गायकीची परंपरा दाखवली. या मूळ नाटकाला ठाण्यातील ज्येष्ठ नाट्यतपस्वी नटवर्य मामा पेंडसे यांनी केले होते. तर ललितकलादर्श नाट्यसंस्थेतर्फे भालचंद्र पेंढारकर यांनी निर्मिती करून पंडित राम मराठे भगवान शंकर, प्रसाद सावकार इत्यादी कलाकारांनी या नाटकाचे तब्बल 2250 प्रयोग भारतभर केले असल्याचे पं. मुकुंद मराठे यांनी नमूद केले.
संपूर्ण महोत्सवाचे सूत्रसंचलन राजेंद्र पाटणकर यांनी केले. तसेच हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी माहिती व जनसंपर्क विभागातील मनाली माईणकर, संदीप जिनवाल, विकास मोरे, सुजाता सोनावणे, मंदार गायकवाड यांच्यासह सर्व कर्मचा-यांनी विशेष मेहनत घेतली.
