
वीज आणि पाणीपुरवठा खंडित करण्याची आमदार केळकर यांची मागणी
ठाण्यात 81 शाळा अनधिकृत असून त्यापैकी एकट्या दिव्यात ६५ शाळा आहेत. सर्वसामान्य विद्यार्थ्यांचे नुकसान करणाऱ्या या शाळांच्या चालकांवर एफआयआर दाखल करूनही या शाळा अद्याप सुरू आहेत. या शाळांना पाठीशी घालणारे झारीतील शुक्राचार्य कोण? असा प्रश्न करत संस्थाचालक आणि सरकारी यंत्रणेच्या संगनमतामुळेच या शाळा सुरू असल्याचा आरोप आमदार संजय केळकर यांनी केला. यावेळी त्यांनी या शाळांचे वीज आणि पाणी खंडित करण्याची मागणी देखील केली.
ठाण्यात विशेषतः मुंब्रा आणि दिवा परिसरात अनधिकृत बांधकामांप्रमाणेच अनधिकृत शाळांचा प्रश्न आ वासून उभा राहिला आहे. या शाळांवर ठोस कारवाई होत नसल्याने या शाळांचे शेपूट वाढतच चालले आहे. त्यामुळे सर्वसामान्य पालक आणि विद्यार्थ्यांची फसवणूक होत असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले आहे. शहरातील ८१ पैकी ६५ अनधिकृत शाळा दिवा परिसरात सुरु असल्याचा दावा अधिकृत शाळा संघटनेकडून केला जात आहे. शैक्षणिक वर्ष सुरु होण्यापूर्वीच शिक्षण अधिकाऱ्यांनी अनधिकृत शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे समायोजन अधिकृत शाळांमध्ये करण्यात यावे अशा सूचना करण्यात आल्या होत्या. मात्र या सूचनेकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. या सर्व शाळांना सर्व प्रकारच्या सुविधा मिळत असल्याने या शाळा सुरु असून हे सर्व सरकारी यंत्रणांच्या संगनमताने सुरु असल्याचा आरोप आमदार केळकर यांनी केला आहे.
शिक्षण विभागाच्या वतीने अनधिकृत शाळांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले, मात्र गुन्हे दाखल होऊनही एकाही संस्थाचालकाला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. अधिकृत शाळांच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी यांदर्भात आमदार संजय केळकर यांची नुकतीच भेट घेतली. त्यावेळी केळकर यांनी पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्याशी चर्चा करून कठोर कारवाईची मागणी केली. तर डुंबरे यांनी कारवाईबाबतचा आढावा घेणार असल्याची माहिती केळकर यांनी दिली.