
ठाणे (दि.24) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहिल्या टप्प्यातील 100 दिवस कृती आराखडा तसेच नुकताच जाहीर झालेल्या 150 दिवस कृती आराखड्यांतर्गत शासकीय कार्यालये व त्यांच्या कामकाजाची पद्धत अंतर्बाह्य कात टाकीत आहेत. यातूनच प्रेरणा घेत ठाणे जिल्हा माहिती कार्यालयाच्या छतावर एक सुंदर, सजीव आणि नाविण्यपूर्ण पर्यावरणस्नेही “टेरेस गार्डन” तयार झाले आहे.
ठाणे जिल्हा माहिती कार्यालयातील या अनोख्या “टेरेस गार्डन” ची चर्चा सर्वत्र आहे. ही केवळ एक बाग नसून लाकूड, प्लॅस्टिक संसाधनात रूपांतर करणाऱ्या जाणीवेचा एक आदर्श नमुना आहे. टाकाऊ वस्तूंचा पुनर्वापर करून छतावर एक हिरवेगार आणि प्रेरणादायी बगीचा उभा करण्यात आला आहे. या बागेत ट्रेसीना, एलिफंट इयर, स्नेक प्लांट, हेनीकेनी, जास्वंद, लेमन ग्रास आणि 45 प्रकारची विविध झाडे बघायला मिळणार आहेत.
ठाण्यातील पर्यावरण तज्ञ विजयकुमार कट्टी या उपक्रमामागची माहिती सांगताना म्हणाले, “प्रत्येक वस्तू वापरून फेकण्याऐवजी तिला दुसरं आयुष्य देता येतं, हेच मी या बागेच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. इथे प्रत्येक रोप म्हणजे शिक्षक आहे. ते आपल्याला संयम, जबाबदारी आणि निसर्गाशी संवाद शिकवतो.”
बागेची वैशिष्ठे:
1) छतावर पर्यावरण स्नेही रचना
2) लाकूड, प्लास्टिक, कपड्यांचा वापर करून कार्यालय परिसरात उष्णता कमी करणारी झाडांची रचना
3) नैसर्गिक डास प्रतिबंधक वनस्पतींचा समावेश
बागेचा उद्देश हिरवळ निर्माण करणे नाही, तर लोकांमध्ये कचऱ्याविषयीचा दृष्टिकोन बदलणे, जागृती घडवणे आणि समाजात सकारात्मक वर्तन परिवर्तन घडवणे हा आहे. ते शासकीय विभाग, DISH, DIC, शैक्षणिक संस्था, बँकर्स, वकील, गृहिणी आणि उद्योजक यांच्यासाठी संवादात्मक सेमिनार घेण्याचे आवाहन करीत आहेत.
ही बाग केवळ उपक्रम न राहो, तर एक जनचळवळ बनावी, यासाठी शासन, समाज आणि प्रत्येक नागरिक यांचा सहभाग महत्त्वाचा आहे. -विजयकुमार कट्टी (ट्री मॅन ठाणे)
या छतावरील बागेचे मॉडेल शाळा, महाविद्यालये, ग्रामीण भाग, गृहनिर्माण संस्था आणि शासकीय इमारतींमध्ये सहजपणे राबविता येऊ शकते. पर्यावरण संरक्षणाची ही कृती आधारित पद्धत ‘विचारातून कृती’कडे नेणारी ठरणार आहे.