
- पावसाळा पूर्व तयारीबाबत दिल्या सूचना
ठाणे (12) : उन्हापासून बचाव होण्यासाठी मोठ्या सिग्नलपाशी लावण्यात आलेली हरित आच्छादने आणि तात्पुरत्या पाणपोई यांच्याबद्दल नागरिकांनी ठाणे महापालिकेस सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे, आवश्यकतेनुसार या दोन्ही सुविधांची संख्या वाढवण्याचे निर्देश ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पर्यावरण विभाग यांना दिले आहेत.
ठाणे महापालिका क्षेत्रासाठी उष्णता कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यानुसार, गतवर्षीपासून महापालिकेतर्फे स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने तात्पुरत्या पाणपोई सुरू करण्यात येतात. यंदाही अशा २५ पाणपोई सुरू करण्यात आल्या आहेत. त्याला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद असून त्यांची संख्या वाढवण्याची गरज आहे. त्यामुळे, स्वयंसेवी संस्था आणि लोकसहभागातून ही संख्या वाढवण्यात यावी, असे निर्देश आयुक्त राव यांनी दिले आहेत.
तसेच, तीन हात नाका (२), अल्मेडा चौक (०१) खोपट (२), नितीन कंपनी (१) या सहा ठिकाणी वाहनचालकांना उन्हापासून काहीसा दिलासा मिळावा यासाठी हरित आच्छादनांची व्यवस्था महापालिकेमार्फत करण्यात आली आहे. आता ठाणे महापालिका क्षेत्रात जिथे ६० सेकंदांपेक्षा जास्त वेळेचा सिग्नल आहे, अशा ठिकाणी हरित आच्छादनांची व्यवस्था करावी, असेही निर्देश आयुक्त राव यांनी दिले आहेत.
राज्य शासनाच्या १०० दिवस कार्यक्रमाची प्रगती, उष्णतेच्या लाटेबाबतच्या उपाययोजना, स्वच्छ सर्वेक्षण, इ-ऑफिस कार्यप्रणालीची अमलबजावणी आदी विषयांचा आढावा महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी गुरूवारी महापालिका मुख्यालय येथे झालेल्या विभाग प्रमुखांच्या आढावा बैठकीत घेतला. कै. अरविंद पेंडसे सभागृह येथे झालेल्या या बैठकीस अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, नगररचना सहाय्यक संचालक संग्राम कानडे, उपायुक्त मनीष जोशी, उमेश बिरारी, जी. जी. गोदेपुरे, दिनेश तायडे, शंकर पाटोळे, सचिन सांगळे, मधुकर बोडके, अनघा कदम, पद्मश्री बैनाडे यांच्यासह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.

पावसाळ्याच्या पूर्व तयारीच्या दृष्टीने होत असलेली झाडांच्या धोकादायक फांद्यांची छाटणी, नालेसफाईच्या कामांची निविदा प्रक्रिया, तसेच खड्डेमुक्त ठाणे मोहिमेच्या प्रगतीचा आढावा या बैठकीत आयुक्त राव यांनी घेतला. वारंवार खड्डे पडणाऱ्या ठिकाणांची आधीच पाहणी करून तेथे प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी. त्यासाठी काही नाविन्यपूर्ण तोडगे काढता आले तर पहावे. जेणेकरून नागरिकांना खड्ड्यांचा सामना करावा लागणार नाही. तसेच, रस्ता नादुरुस्त असल्याची तक्रार आल्यापासून २४ तासांच्या आत ती तक्रार मार्गी लागेल यासाठी गेल्यावर्षीप्रमाणेच सर्व यंत्रणांना समन्वय ठेवावा, असे आयुक्त राव यांनी स्पष्ट केले.