
ठाणे (17 Oct) : ठाणे शहरातील हवेची गुणवत्ता मध्यम या वर्गवारीत असल्याने राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशानुसार ठाणे महापालिका क्षेत्रात केवळ हरित फटाके वाजवण्याची परवानगी आहे. त्यामुळे नागरिकांनी त्याचे पालन करून प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करावी, असे आवाहन ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले आहे. सर्व ठाणेकरांना दिवाळी सणाच्या निमित्ताने आयुक्त सौरभ राव यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचबरोबर, आनंददायी दिवाळी साजरी करताना आरोग्याची खबरदारी घेण्याचेही आवाहन राव यांनी केले आहे.
सणांच्या काळात रात्री १० वाजेपर्यंतच तसेच केवळ हरित फटाके फोडण्याची परवानगी आहे. प्रदूषणमुक्त सण साजरा करून नागरिकांनी स्वत:सोबतच प्राणी, पक्षी, झाडे यांचाही फटाक्यांच्या दुष्परिणामांपासून बचाव करावा, असे आयुक्त राव यांनी म्हटले आहे. या संदर्भातील आवाहन करणारे जनजागृती फलकही महापालिका क्षेत्रात प्रर्दशित करण्यात आले आहेत.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार नागरिकांनी हरित फटाके फोडताना काळजी घ्यावी. फटाके फोडताना, सिंथेटीक कपड्यांऐवजी सुती कपडे परिधान करावेत. मोकळ्या जागेत फटाके फोडावेत. फटाके फोडताना पाणी आणि वाळू यांचा साठा जवळपास ठेवावा. फटाके फोडताना लहान मुलांकडे विशेष लक्ष द्यावे. तसेच, ज्येष्ठ नागरिक, रुग्ण यांना त्रास होणार नाही, याची काळजी घ्यावी. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या सूचनांनुसार नागरिकांनी जबाबदारीने फटाके फोडावेत, असे आवाहन महापालिकेच्या पर्यावरण विभागाने केले आहे.