ठाणे (दि.8 ) : अनुसूचित जाती, अनुसूचित जनजाती व वंचित दुर्बल घटकातील व्यक्तींच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय साध्य करण्यासाठी राज्य शासनाकडून विविध कल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेला व्हावी तसेच जनतेत जनजागृती निर्माण व्हावी या उद्देशाने दि.8 एप्रिल ते 14 एप्रिल या कालावधीत राज्यात “भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह” हा कार्यक्रम साजरा करण्यात येणार आहे. त्यानुषंगाने ठाणे जिल्ह्यातही विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे समाज कल्याण सहायक आयुक्त समाधान इंगळे यांनी कळविले आहे

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह 2025 कार्यक्रम:-
# मंगळवार, दि.8 एप्रिल 2025 ते सोमवार दि.14 एप्रिल 2025 या कालावधीत भारतीय संविधानाची उद्देशिका / प्रस्ताविका यांचे वाचन करून भारतीय जनतेत संविधानाविषयी जनजागृती निर्माण करणे.
# बुधवार, दि.9 एप्रिल 2025 रोजी विभागातील सर्व महाविद्यालये, शासकीय वस्तीगृहे येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, लघुनाट्य स्पर्धा इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करणे.
# गुरुवार, दि.10 एप्रिल 2025 रोजी जिल्हा व विभागीय स्तरावर कार्यक्रमाचे आयोजन करून विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनांचा लाभ प्रातिनिधिक स्वरूपात लाभार्थ्यांना वाटप करणे तसेच विभागामध्ये समता दूतांमार्फत ग्रामीण व शहरी भागात पथनाट्य व लघुनाटिका याद्वारे सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांबाबत जनतेचे प्रबोधन करणे.
# शुक्रवार, दि.11 एप्रिल 2025 रोजी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांच्यामार्फत प्रत्येक जिल्ह्यात मार्जिन मनी योजनेंतर्गत कार्यशाळेचे आयोजन करणे. तसेच योजनेचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांची कार्यशाळा आयोजित करणे. त्याचप्रमाणे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करणे व त्यांच्या सामाजिक कार्याविषयी माहिती देण्याकरिता कार्यक्रमांचे आयोजन करणे.
# शनिवार, दि.12 एप्रिल 2025 रोजी संविधान जागर – भारतीय संविधानाविषयी सर्वसाधारण माहिती देणे. जसे की संविधानाची निर्मिती समिती, अनुच्छेद विशेषत: मूलभूत अधिकार व मूलभूत कर्तव्य या विषयी व्याख्यान आयोजित करणे.
# रविवार, दि.13 एप्रिल 2025 रोजी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयात महिला मेळावा आयोजित करून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांसाठी केलेल्या कार्याबद्दल माहिती देणारे व्याख्यान आयोजित करणे. जिल्ह्यात ज्येष्ठ नागरिकांसाठी जनजागृती शिबिर व ज्येष्ठ नागरिकांचा मेळावा आयोजित करणे. तसेच जिल्ह्यात जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या सहकार्याने विभागातील सर्व शाळा, महाविद्यालय, शासकीय वस्तीगृह येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करणे. सर्व शासकीय कार्यालयांमध्ये स्वयंसेवी संस्थांच्या सहाय्याने जिल्ह्यातील सर्व महत्त्वाच्या ठिकाणी व अनुसूचित जाती व नवबौद्ध घटक यांच्या वस्त्यांमधून स्वच्छता अभियान राबविणे.
# सोमवार, दि.14 एप्रिल 2025 रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अधिनस्त सर्व शासकीय कार्यालय, शाळा, महाविद्यालये, येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन व व्याख्याने, चर्चासत्र इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करणे. जिल्हास्तरावर कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान मेळावा आयोजित करून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी शेतकऱ्यांसाठी केलेल्या कार्याबददल माहिती सांगणारे व्याख्यान आयोजित करणे. जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयात Online-Validity प्रमाणपत्र प्रदान करणे.