
ठाणे (02) : शासकीय कार्यालयातील दैनंदिन कामकाज सुलभ, पारदर्शक व गतिमान पध्दतीने कामे व्हावीत यासाठी आजपासून ठाणे महापालिकेत ई-ऑफिस कार्यप्रणालीची सुरूवात करण्यात आली. या कार्यप्रणालीच्या माध्यमातून दैनंदिन सुसूत्रता येण्यास मदत होणार आहे. या कार्यप्रणालीचा आढावा आज आयुक्त सौरभ राव यांनी घेतला असून या कार्यप्रणालीमुळे दैनंदिन कामकाज अधिक प्रभावीपणे होणार असल्याचे आयुक्तांनी नमूद केले.
महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार सुरू करण्यात आलेल्या ई ऑफिस कार्यप्रणालीसाठी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, उपायुक्त मुख्यालय जी.जी. गोदेपुरे, माहिती तंत्रज्ञान विभागाचे उपायुक्त सचिन सांगळे, नितीन डुंबरे यांच्यासह, विभागातील सर्व कर्मचारी यांचे सहकार्य या कामी लाभले असून सर्व अधिकारी कर्मचारी यांनी ई ऑफिस कार्यप्रणालीचा अवलंब करावा असेही आयुक्तांनी यावेळी नमूद केले.
महाराष्ट्र शासनाने राबविलेल्या मिशन शंभर दिवस या उपक्रमातंर्गत ई ऑफिस कार्यप्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. महापालिकेच्या माध्यमातून विविध प्रकारचे प्रकल्प राबविले जातात, याबाबतचे प्रस्ताव कनिष्ठपासून वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यत मंजुरीसाठी पाठविले जातात, यामध्ये बराचसा विलंब होत असतो, परिणामी विकास कामे ही विहित मुदतीत पूर्ण करणे शक्य होत नाही. ई ऑफिस कार्यप्रणालीमध्ये कामाचा प्रस्ताव तयार करुन तो लगेचच तो संबंधित अधिकाऱ्यांमार्फत संगणकीय प्रणालीमध्ये अपलोड केला जाईल व या प्रस्तावाचा प्रवास सुरू झाल्यावर कोणत्या स्तरावर प्रस्ताव आहे याची माहिती वरिष्ठांना तातडीने मिळण्यास मदत होणार आहे. ई ऑफिस कार्यप्रणालीमुळे कोणत्याही कामाचा प्रस्ताव एक ते दोन दिवसात मार्गी लागण्यास मदत होणार आहे. शिवाय या कामामध्ये सुसूत्रता व पारदर्शकता देखील राहणार आहे. तसेच प्रत्येक प्रस्तावाला ई- नंबर दिला जाणार असून संबंधित प्रस्ताव कोणत्या अधिकाऱ्यांच्या स्तरावर आहे किंवा त्यास विलंब झाला याचे देखील ट्रेकिंग ठेवण्यात येणार आहे.
महापालिकेतील सर्व विभागप्रमुखांनी पत्रव्यवहारासाठी ई ऑफिस प्रणालीचा अवलंब काटेकोरपणे करावा अशा सूचना आयुक्त सौरभ राव यांनी यावेळी दिल्या. या प्रणालीमुळे दफ्तर दिरंगाई कमी होण्यास निश्चितच मदत होणार आहे. तसेच नागरिकांच्या तक्रारी व समस्यांचे निराकरण देखील तातडीने करण्यात येणार असल्याने वेळेच्या बचतीबरोबर कामकाजाचे योग्य नियोजन करण्यास मदत होणार आहे. त्यामुळे नागरिकांना कामासाठी महापालिका मुख्यालय व प्रभागसमितीमध्ये जाण्याची गरज भासणार नाही असेही आयुक्तांनी यावेळी स्पष्ट केले.
———-