
ठाणे महानगरपालिकेच्या सरळसेवा भरती 2025-26 अंतर्गत गट ‘क’ व गट ‘ड’ संवर्गातील अग्निशमन व अभियांत्रिकी विभागातील पदांसाठी दिनांक 01 व 02 सप्टेंबर 2026 रोजी घेण्यात आलेली ऑनलाइन संगणकाधारित (Online Computer Based Test) परीक्षा महाराष्ट्रातील एकूण 21 परीक्षा केंद्रावर सुरक्षित, पारदर्शक आणि सुरळीतपणे पार पडली असल्याचे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी स्पष्ट केले.
ठाणे महानगरपालिका आस्थापनेवरील गट ‘क’ व गट ‘ड’ मधील रिक्त पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्याकामी जाहिरात दिनांक 10/08/2026 रोजी दैनिक वृत्तपत्रामध्ये तसेच महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली होती.
अग्निशमन व अभियांत्रिकी विभागातील एकूण 07 संवर्गांतील 708 पदांसाठी ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेसाठी 23,030 उमेदवारांनी अर्ज सादर केले होते. परीक्षेसाठी एकूण तर 13,941 उमेदवार उपस्थित होते.
परीक्षा पारदर्शक व सुरक्षित वातावरणात पार पाडण्यासाठी प्रत्येक परीक्षा केंद्रावर केंद्रनिहाय समन्वय अधिकारी आणि निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती. तसेच परीक्षा केंद्रावर कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी व कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
संपूर्ण परीक्षा प्रक्रियेवर मुख्यालय स्तरावरुन प्रभावी नियंत्रण व देखरेख ठेवण्यासाठी ठाणे महापालिका मुख्यालय येथे कमांड सेंटरची स्थापना करण्यात आली होती. या कमांड सेंटरच्या माध्यमातून परीक्षेच्या संपूर्ण प्रक्रियेवर मुख्यालय स्तरावरुन सातत्यपूर्ण देखरेख व नियंत्रण ठेवणे शक्य झाले. संपूर्ण परीक्षा प्रक्रिया अत्यंत सुरक्षित, पारदर्शक आणि शांततापूर्ण वातावरणात पार पडली असून, परीक्षेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही.