
ठाणे, (05) : दिवा प्रभाग समिती हद्दीतील विविध विकासकामांची ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांनी प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांकडून कामांचा सविस्तर आढावा घेतला. रस्ते, वाहतूक व्यवस्था, प्रलंबित पुलांची कामे, पाणीपुरवठा, ड्रेनेज, स्वच्छता, सुशोभीकरण, सार्वजनिक आणि पायाभूत सुविधांशी संबंधित कामांची पाहणी करताना प्रलंबित व अर्धवट कामांना गती देऊन ती गुणवत्तापूर्ण आणि नियोजित कालावधीत पूर्ण करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.
या पाहणी दौऱ्यास दिवा प्रभाग समिती अध्यक्ष दिपक जाधव, स्थानिक नगरसेवक रमाकांत मढवी, बाबाजी पाटील, शैलेश पाटील, आदेश भगत, नगरसेविका अर्चना पाटील, साक्षी मढवी, वेदिका पाटील, नगरअभियंता प्रशांत सोनग्रा, उपायुक्त दिपक झिंजाड, वैभव आवारे, उपनगरअभियंता मोहन कलाल, शुभांगी केसवाणी, विकास ढोले, सहायक आयुक्त शिवकुमार नागरगोजे, कार्यकारी अभियंता धनंजय मोदे,अंजुम अहमद आदी उपस्थित होते.
पाहणी दौऱ्याची सुरुवात वाय जंक्शन, शीळ फाटा सर्कल येथून करण्यात आली. दिवा-शीळ मार्गावरील वाढती वाहतूक लक्षात घेता वाहतूक सुरळीत राहण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या. खर्डी आणि दिवा-शिळ रोडचे काँक्रिटीकरण, पुलाखालील परिसराचे सुशोभीकरण, रस्ते रुंदीकरण आणि लँडस्केपिंगची कामे वेगाने पूर्ण करण्याबरोबरच रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजविण्याचे निर्देश देण्यात आले.
शीळ-दिवा रोडवरील प्रलंबित कामांचा तसेच खाडी परिसरातील विकासकामांचा आढावाही यावेळी घेण्यात आला. सांडपाणी वाहिन्या, नालेसफाई, विद्युत सुविधा आणि इतर मूलभूत सुविधांशी संबंधित कामे वेळेत पूर्ण करण्यावर भर देण्यात आला.

स्टेशन परिसरातील वाहतूक आणि नागरिकांच्या सुविधांचा आढावा
दिवा पोलीस स्टेशन परिसरातील विकासकामांची पाहणी आयुक्तांनी पाहणी केली. स्टेशन परिसरातील वाहतूक व्यवस्था, पार्किंग, पादचारी सुविधा आणि नागरिकांची सुरक्षितता याबाबत आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या. दिवा रेल्वे स्थानक परिसरातील स्वच्छता, सुशोभीकरण आणि पायाभूत सुविधांची पाहणी करून हा परिसर अधिक स्वच्छ, सुरक्षित आणि नागरिकांसाठी सोयीस्कर करण्यासाठी महापालिका व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश देण्यात आले.
एफओबी, तलाव सुशोभीकरणासह विविध कामांना गती
दिवा पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणाऱ्या रेल्वे ओव्हर ब्रिजचे (एफओबी) काम सुरू करण्याबाबत आयुक्तांनी सूचना दिल्या. पुलाशेजारील गटाराचे काम, दिवा स्टेशन परिसरातील तलावाचे सर्वेक्षण करून त्याचे सुशोभीकरण, तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौकातील पुतळ्याचे काम आणि चौक सुशोभीकरणाची कामे मार्गी लावण्याबाबत चर्चा करण्यात आली.
टाटा पॉवर धर्मवीर रस्त्याचे काम सुरू करणे तसेच टाटा पॉवर नॅशनल स्कूल परिसरातील अर्धवट अवस्थेतील कामाचीही पाहणी करण्यात आली. रखडलेल्या कामांमागील तांत्रिक किंवा प्रशासकीय अडचणी दूर करून त्यांना गती देण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
स्वच्छता आणि फेरीवाल्यांच्या प्रश्नावरही निर्देश
दिवा शहरातील मुख्य रस्त्यांवरील फेरीवाल्यांमुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी आणि नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या. शहरातील स्वच्छता व्यवस्था अधिक प्रभावी करण्यासाठी नियमित स्वच्छता कर्मचारी आणि आवश्यक यंत्रसामग्री उपलब्ध करून देण्याचे निर्देशही आयुक्तांनी संबंधित अधिकारी यांना दिले.
सार्वजनिक स्वच्छतागृहे, आरोग्य केंद्र, पोस्ट ऑफिस, पोलीस स्टेशन, प्रभाग समिती कार्यालय परिसर यांसह विविध नागरी सुविधांचीही पाहणी करण्यात आली. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नालेसफाई आणि सांडपाणी व्यवस्थेची कामे प्राधान्याने पूर्ण करण्यावर भर देण्यात आला.
दिवा-शीळ रोडवरील थांबविण्यात आलेले नाल्याचे काम पुन्हा सुरू करण्याबाबतही पाहणीदरम्यान चर्चा करण्यात आली. या कामासाठी संबंधित शेतकऱ्यांना मोबदला देण्याच्या प्रश्नावर आवश्यक कार्यवाही करण्याबाबत चर्चा करण्यात आली. दिवा प्रभागातील विकासकामे नियोजित वेळेत पूर्ण करण्यासोबतच त्यांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड केली जाऊ नये, असे आयुक्त सौरभ राव यांनी स्पष्ट केले. ज्या ठिकाणी अतिक्रमणामुळे होणारी वाहतूक कोंडी, तांत्रिक अडचणी किंवा अन्य कारणांमुळे कामे रखडली आहेत, त्या समस्या तातडीने दूर करून विकासकामांना गती देण्याचे निर्देश त्यांनी दिले.