
ठाणे (प्रतिनिधी) : सॅटीस पुलाच्या कामामुळे सातत्याने ठाणे पूर्व भागात होणारी वाहतूककोंडी दूर करण्यासाठी भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक भरत चव्हाण व भाजयुमोचे प्रदेश सचिव ओमकार चव्हाण यांनी पुढाकार घेतला आहे. सॅटीस प्रकल्पातील कामामुळे होणाऱ्या अडथळ्यांच्या पार्श्वभूमीवर सोमवारी ठिकठिकाणी पाहणी करून वाहतूक सुरळीत होण्यासाठी सूचना दिल्या. त्यावेळी येत्या ऑक्टोबरपर्यंत प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यानंतर ठाणे पूर्व भागात वाहतूककोंडीची समस्या होणार नसल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
ठाणे पूर्व भागात सॅटीस प्रकल्प सुरू असल्यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. सॅटीस प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आहे. या पार्श्वभूमीवर नगरसेवक भरत चव्हाण व ओमकार चव्हाण यांनी संबंधित अधिकाऱ्यांसह पुलाची पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला. त्यावेळी काही कामांबाबत सूचना केल्या
ठाणे पूर्व ते पश्चिम भाग जोडणाऱ्या पादचारी पुलाचे काम संथ गतीने सुरू असल्याचे निदर्शनास आले. त्यावेळी पुढील ७ ते ८ दिवसांत काम पूर्ण करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांकडून देण्यात आले. या पुलामुळे अष्टविनायक चौक, सुदर्शन कॉलनी आणि चेंदणी कोळीवाडा परिसरातील नागरिकांना पश्चिमेकडे सहजपणे प्रवास करता येईल. या दौऱ्यावेळी प्रकल्पाच्या काही खांबांच्या ठिकाणी वाहतूकीला अडथळे येत असल्याचे आढळले. ते लवकरात लवकर दूर करण्याची विनंती नगरसेवक भरत चव्हाण व ओमकार चव्हाण यांनी केली. कोणत्याही अडथळ्यांविना वाहतूक सुरळीत करण्यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने राबवण्याची मागणी केली. त्यावर तत्काळ कार्यवाही करण्याचे आश्वासन महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आले.