
ठाणे, दि. 16 (प्रतिनिधी) : कोपरी रेल्वे स्टेशन परिसरात सुरू असलेल्या अनैतिक व्यवसायाकडे भाजपचे नगरसेवक भरत चव्हाण यांनी काल शुक्रवारी महासभेचे लक्ष वेधले. तसेच यापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानंतर महापालिकेकडून सुरू केलेले गस्ती पथक पुन्हा तैनात करण्याची आग्रही मागणी केली. या प्रकरणी महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी कोपरीतील सर्व स्थानिक नगरसेवकांची एकत्रित बैठक घेऊन निर्णय घेणार असल्याचे जाहीर केले.
ठाणे रेल्वे स्थानकाच्या पूर्व बाजूकडील कोपरीतील दोन बेकायदा लॉजमध्ये मोठ्या प्रमाणावर अनैतिक व्यवसाय सुरू आहेत. या बेकायदा लॉजचा आसरा घेऊन अनैतिक व्यवसाय करणाऱ्या महिला ग्राहकांच्या शोधासाठी रेल्वे स्टेशनपासून कोपरीतील मुख्य रस्त्यावर उभ्या राहतात. त्यामुळे रेल्वे स्टेशन परिसरातील शाळेत मुलांना सोडण्यासाठी आलेल्या महिला, महाविद्यालयीन तरुणी, रिक्षाची वाट पाहणाऱ्या महिला आणि रेल्वे स्टेशनहून घरी पायी जाणाऱ्या महिलांना मद्यपी व आंबटशौकिनांकडून विचारणा केली जाते. त्यामुळे स्थानिक महिलांची कुचंबणा होत आहे. या प्रकाराकडे पोलिस व महापालिका प्रशासनाचे सातत्याने लक्ष वेधण्यात आले. मात्र, त्याची दखल घेण्यात आलेली नाही. कोपरी परिसरात सामान्य महिलांचे जगणे कठीण झाले आहे, अशी भावना नगरसेवक भरत चव्हाण यांनी व्यक्त केले.
यापूर्वी पोलिस स्टेशन व महापालिकेकडे तक्रारी करण्यात आल्या. मात्र, थातूरमातूर कारवाई झाल्यानंतर पुन्हा दोन्ही लॉजमध्ये अनैतिक व्यवसाय सुरू होतात, याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. या प्रकाराला स्थानिक व्यापारीही कंटाळले आहेत.
यापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानंतर महापालिकेच्या माध्यमातून गस्ती पथक तैनात करण्यात आले. या पथकासाठी महापालिकेच्या अर्थसंकल्पातून तरतूद करण्यात आली होती. त्यामुळे काही महिने नागरिकांना दिलासा मिळाला. मात्र, गस्ती पथक बंद केल्यानंतर पुन्हा रस्त्यावर अनैतिक व्यवसायात गुंतलेल्या महिला उभ्या राहण्यास सुरुवात झाली. त्यामुळे पुन्हा गस्ती पथक सुरू करावे, अशी मागणी नगरसेवक भरत चव्हाण यांनी केली.
कोपरी परिसरातून महापौर शर्मिला पिंपळोलकर निवडून आल्या आहेत. त्यामुळे या गंभीर प्रश्नाची तीव्रता लक्षात घेऊन महापौरांनी तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी भरत चव्हाण यांनी महासभेत केली.