
घरी येणाऱ्या प्रगणकांना सहकार्य करण्याचे महापौर व आयुक्तांचे आवाहन
ठाणे (15) : ठाणे महापालिकेमार्फत जनगणना 2027 च्या पहिल्या टप्प्यातील “स्व-गणना” (Self-Enumeration) प्रक्रिया 1 मे ते 15 मे 2026 या कालावधीत राबविण्यात आली होती. या प्रक्रियेच्या अंतिम दिवशी मोठ्या संख्येने नागरिकांनी स्वयंगणना पूर्ण करून प्रशासनाला सहकार्य केले आहे. त्याच पध्दतीने 16 मे पासून घरी येणाऱ्या प्रगणकाला नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन महापौर शर्मिला पिंपळोलकर आणि महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले आहे.
16 मे 2026 पासून घराघरांत प्रगणक भेट देणार आहेत. 1 ते 15 मे दरम्यान स्वगणना पूर्ण केलेल्या नागरिकांना विशेष कोड प्राप्त झाला आहे. हा कोड घरी येणाऱ्या प्रगणकांना दाखविणे आवश्यक राहणार आहे. ज्या नागरिकांनी स्वगणना केलेली नाही, त्यांनी प्रगणकांकडून विचारल्या जाणाऱ्या प्रश्नावलीची अचूक उत्तरे देऊन सहकार्य करावे, असे सहायक आयुक्त सचिन बोरसे यांनी स्पष्ट केले.
राज्यातील प्रत्येक व्यक्तीच्या विकास आणि कल्याणासाठी अचूक व विश्वासार्ह माहिती अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे नागरिकांनी प्रगणकांना खरी आणि संपूर्ण माहिती द्यावी तसेच माहिती देण्यास टाळाटाळ करू नये.
जनगणना 2027 साठीची ही प्रक्रिया प्रशासन व नागरिकांच्या विकास व प्रगतीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानली जात असून, नागरिकांच्या सक्रिय सहभागामुळे माहिती संकलन अधिक प्रभावी होणार आहे. घरी येणाऱ्या प्रगणकामार्फत जनगणना करण्यासाठी पाच ते सात मिनिटे वेळ लागत असून सर्व नागरिकांनी आपली जनगणना पूर्ण करुन सहकार्य करावे असेही बोरसे यांनी नमूद केले.