
ठाणे (30) : स्वच्छ सर्वेक्षण हे केवळ गुणांकनापुरते मर्यादित नसून शहराच्या एकूण जीवनमानाशी निगडित आहे. घनकचरा व्यवस्थापन, ओला व सुका कचरा विलगीकरण, घराघरातून कचरा संकलन, सार्वजनिक स्वच्छता व्यवस्था आणि कचरा प्रक्रिया या प्रत्येक टप्प्यावर नियोजनबद्ध व शिस्तबद्ध काम करणे आवश्यक आहे. नोडल अधिकाऱ्यांनी आपल्या जबाबदाऱ्या स्पष्टपणे ओळखून क्षेत्रीय पातळीवर प्रभावी अंमलबजावणी करावी, असे आयुक्त सौरभ राव यांनी आज झालेल्या बैठकीत स्पष्ट केले.
केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण 2025 करिता महानगरपालिकेच्या वतीने प्रभागसमितीनिहाय टास्क फोर्स स्थापन करण्यात आली असून या टास्क फोर्सचे सदस्य म्हणून अंतर्गत नोडल अधिकाऱी नेमण्यात आले आहेत. या नोडल अधिकाऱ्यांसाठी आज (30 डिसेंबर) ठाणे महापालिकेच्या कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या या कार्यक्रमास उपायुक्त जी. जी. गोदेपुरे, उमेश बिरारी, मधुकर बोडके, दीपक झिंजाड, मिताली संचेती, अनघा कदम, घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे आदी उपस्थित होते.
नोडल अधिकाऱ्यांच्या क्षमता वृद्धी (Capacity Building) प्रशिक्षण कार्यक्रमात आयुक्त सौरभ राव यांनी उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केले. शहर स्वच्छतेत गुणवत्ता, सातत्य आणि नागरिक सहभाग या तीन घटकांवर भर देत त्यांनी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना उद्देशून मार्गदर्शन केले. स्वच्छ सर्वेक्षण २०२५ मधील नवीन मार्गदर्शक सूचना, गुणांकन पद्धती आणि मूल्यांकन निकष यांची सखोल माहिती असणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले. माहिती संकलन, दस्तऐवजीकरण, फोटो व जीपीएस आधारित नोंदी, तसेच ऑनलाईन प्रणालीवर अचूक व वेळेत माहिती अपलोड करण्यावर त्यांनी विशेष भर दिला. कोणतीही माहिती अपूर्ण राहू नये यासाठी प्रत्येक घटकाची तपासणी करून कामकाज करावे, असे निर्देश त्यांनी दिले.
नागरिकांचा सक्रिय सहभाग हा स्वच्छ सर्वेक्षणातील महत्त्वाचा घटक असून जनजागृती, नागरिक अभिप्राय, तक्रार निवारण यंत्रणा प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश दिले. स्वच्छता सेवकांचे आरोग्य, सुरक्षितता व सन्मान जपणे तसेच आधुनिक यांत्रिकीकरणाचा योग्य वापर करून कामाची गुणवत्ता वाढवावी, असेही आयुक्तांनी नमूद केले. या प्रशिक्षण कार्यक्रमामुळे नोडल अधिकाऱ्यांची कार्यक्षमता वाढेल आणि स्वच्छ सर्वेक्षण २०२५ मध्ये शहराची कामगिरी अधिक उंचावेल, असा विश्वास आयुक्त सौरभ राव यांनी व्यक्त केला.