
ठाणे (29) येत्या 15 जानेवारी 2026 रोजी होणाऱ्या ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान प्रक्रिया पारदर्शक, सुरळीत व नियमबद्ध पार पडावी, यासाठी मतदान केंद्रावर काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना आज राम गणेश गडकरी रंगायतन व डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे सविस्तर प्रशिक्षण देण्यात आले.आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली दोन सत्रांमध्ये या प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते.
डॉ. काशिनाथ घाणेकर नाटयगृह येथे आयोजित केलेल्या प्रशिक्षण वर्गास उपायुक्त उमेश बिरारी यांनी तर राम गणेश गडकरी रंगायतन येथे आयोजित केलेल्या प्रशिक्षणात कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे सेवानिवृत्त उपायुक्त विनय कुळकर्णी यांनी सर्व मार्गदर्शन केले. यावेळी उपायुक्त जी.जी गोदेपुरे उपस्थित होते. यावेळी निवडणूक विभागाचे कर्मचारी गिरीष झेंडे, तुषार जाधव उपस्थित होते. दिनांक 28/12/2025 व दि. 29/12/2025 या दोन दिवशी देखील प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.

मतदान केंद्रावर प्रत्यक्ष काम करणारे मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी 1, 2 व 3 यांना आज प्रशिक्षण देण्यात आले. ठाणे महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक 15 जानेवारी 2026 रोजी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर दिनांक 14 जानेवारी 2026 रोजी सर्व कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रावर लागणारे साहित्य देण्यात येणार असून सदर साहित्य घेवून सर्व पथकांनी त्यांना नेमून दिलेल्या मतदान केंद्रावर उपस्थित राहावयाचे आहे. मतदान केंद्राच्या इमारतीपासून 100 मीटर क्षेत्राची रेषा सर्व रस्त्यांवर चुन्याच्या सहाय्याने आखण्यात यावी, मतदान केंद्राच्या वर्ग खोलीत राजकीय व्यक्ती मान्यवर व्यक्ती यांची छायाचित्रे लावलेली असल्यास ती झाकण्यात यावीत, मतदानाच्या गोपनीयतेचा भंग होणार नाही अशारितीने मतदान कक्ष स्थापित करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.
या प्रशिक्षणात, मतदान साहित्याची तपासणी व वितरण, मतदार यादीचा वापर, ओळख पडताळणी मतदानाची गोपनीयता राखणे तसेच मतदानानंतर ईव्हीएम सील करण्याच्या प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.
आचारसंहिता, निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचना, आपत्कालीन परिस्थितीत घ्यावयाची खबरदारी, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस यंत्रणेशी समन्वय, तसेच तक्रार निवारणाची पद्धत याबाबत अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. मतदानाच्या दिवशी कोणतीही चूक अथवा गैरप्रकार होऊ नये, यासाठी प्रत्येक टप्प्यावर नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
प्रशिक्षणादरम्यान प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून ईव्हीएम हाताळणी, मॉक पोल प्रक्रिया, मतदारांच्या शंकांचे निरसन कसे करावे याचेही सादरीकरण करण्यात आले. तसेच मतदान केंद्रावरील अधिकारी कर्मचारी यांना ईव्हीएम मशीन प्रत्यक्ष हाताळणीसाठी देण्यात आले.

# टपाली मतदान
मतदान केंद्रावर नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी, कर्मचारी यांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी आज टपाली अर्जाचे वाटप करण्यात आले. हे टपाली अर्ज दुसऱ्या प्रशिक्षणाच्या वेळेस कर्मचाऱ्यांनी दाखल करावेत असे सांगण्यात आले.