
नांदीफ्लूजन आणि फोकलोक कार्यक्रमाने ठाणेकर रसिक सुखावले
ठाणे (15) : ठाणे शहराचा सांस्कृतिक मानबिंदू असलेल्या राम गणेश गडकरी रंगायतन नाट्यगृहाच्या नूतनीकृत वास्तूचा भव्य लोकार्पण सोहळा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते आणि ज्येष्ठ रंगकर्मी सुहास जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वातंत्र्यदिनी करण्यात आला.
या अविस्मरणीय सोहळ्यास, खासदार नरेश म्हस्के, आमदार संजय केळकर, आमदार अॅड. निरंजन डावखरे, माजी खासदार विनय सहस्रबुद्धे, माजी महापौर मिनाक्षी शिंदे, महापालिका आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, अ. भा. मराठी नाट्य परिषदेचे विश्वस्त अशोक हांडे, प्रमुख कार्यवाह अजित भुरे, ज्येष्ठ अभिनेते अशोक समेळ, लोककलांचे अभ्यासक प्रकाश खांडगे, अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे आदी मान्यवर उपस्थित होते. त्याचबरोबर, प्रेक्षागृहात, रंगकर्मी, ज्येष्ठ माजी नगरसेवक, नामवंत ठाणेकर नागरिक, ज्येष्ठ संपादक, पत्रकार आदी आवर्जून उपस्थित होते.
गेले काही महिने नूतनीकरणासाठी गडकरी पडदा बंद, रंगमंच सुना होता. नाट्य रसिकांना वाट पहावी लागली. तो दिवस आज उजाडला आहे. तिसरी घंटा झालेली आहे. नूतनीकृत गडकरी रंगायतनचे लोकार्पण झाले आहे, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. कलाकारांच्या सूचना लक्षात घेऊन या नूतनीकरणाचे काम झाले आहे. ही वास्तू मोडकळीला आली होती. तिचे पूर्ण रुप या नूतनीकरणाने पालटले आहे. लिफ्ट आली आहे. त्यामुळे आता ही वास्तू आणखी सुंदर आणि दिमाखदार झाल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
बदलत्या ठाण्यात अनेक गोष्टी येत आहेत. रस्ते, मेट्रो, स्वच्छता यांच्यासोबत आता एक हापूस पार्कही केले जाणार आहे. सेंद्रीय शेतीचा प्रकल्प यापूर्वीच महापालिकेने केला आहे, असेही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले.
ठाण्याचे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी प्रास्ताविकपर भाषणात गडकरी रंगायतनच्या कामाचा आढावा घेतला. तसेच,
अ. भा. मराठी नाट्य परिषदेचे विश्वस्त अशोक हांडे यांनी कलाकारांनी केलेल्या सूचनांची दखल घेऊन नूतनीकरण करण्यात आल्याबद्दल महापालिकेचे कौतुक केले.

सुहास जोशी यांचा सन्मान
वयाची ७८ वर्षे आणि रंगभूमीवरील योगदानाची ५२ वर्षे पूर्ण करीत असलेल्या ज्येष्ठ रंगकर्मी सुहास जोशी यांचा याप्रसंगी आयुक्त सौरभ राव यांनी सन्मान केला.नूतनीकरणातील योगदानाबद्दल सत्कार
रंगायतनच्या नूतनीकरणात योगदान देणाऱ्यांमधील महापालिकेचा सार्वजनिक बांधकाम विभागाचे नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, उपनगर अभियंता सुधीर गायकवाड, उपनगर अभियंता शुभांगी केसवानी, कार्यकारी अभियंता भगवान शिंदे, गडकरी रंगायतनच्या नावाचे अक्षरसुलेखन करणारे, तसेच या संपूर्ण नूतनीकरण कामाचे नियमित परीक्षण कऱणारे उपायुक्त (जनसंपर्क) उमेश बिरारी, कंत्राटदार रवींद्र चव्हाण आणि सल्लागार हितेन सेठी यांच्या वतीने तेजस्विनी पंडित यांचा
याप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

…आणि तिसरी घंटा झाली!
लोकार्पण सोहळ्यासाठी गडकरी रंगायतन आणि त्यासमोरील पूर्ण रस्ता दोन्ही बाजूंनी सजवण्यात आला होता. मुख्य मंचीय कार्यक्रमापूर्वी, गडकरी रंगायतनच्या दर्शनी भिंतीवरील नामफलक आणि कोनशिला यांचे अनावरण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. त्यानंतर, त्यांनी रंगायतनच्या वास्तूमध्ये प्रवेश करून नव्याने करण्यात आलेल्या बदलांची, व्यवस्थेची पाहणी केली. त्यानंतर ते प्रेक्षागृहात स्थानापन्न झाले. त्यानंतर, राष्ट्रगीत व राज्यगीत होऊन तिसरी घंटा देण्यात आली. गेले दहा महिने बंद असलेला रंगायतनचा पडदा नांदीच्या सुरावटींवर पुन्हा उघडला आणि रसिकांनी टाळ्यांचा गजर केला. नांदी, फ्लूजन आणि फोकलोक
ज्येष्ठ शास्त्रीय गायक मुकुंद मराठे यांच्यासह संपदा माने, तन्वी गोरे, शरण्या शेणॉय, धवल भागवत, श्रीकर कुलकर्णी, प्रतीक फणसे या युवा कलाकारांनी नांदी सादर केली. त्यांना केदार भागवत (ऑर्गन), आदित्य पानवलकर (तबला) आणि
सुधांशू सोमण (हार्मोनियम) या कलाकारांनी वादन साथ केली. विशेष म्हणजे, रंगायतनच्या उद्घाटन प्रसंगी संगीतभूषण पं. राम मराठे यांनी नांदी सादर केली होती. त्यावेळी युवा कलाकार म्हणून मुकुंद मराठे सोबत होते. ४८ वर्षांनी आजच्या नूतनीकरणानंतरच्या सोहळ्यात त्यांनी नांदीसाठी मार्गदर्शनही केले आणि त्यात सहभागही घेतला.
नांदीपाठोपाठ,
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेल्या ठाण्यातील मान्यवर कलाकारांनी ‘फ्लूजन’ हा कलाविष्कार सादर केला. त्यात, पं. विवेक सोनार (बासरी), पं. मुकुंदराज देव (तबला), मोहन पेंडसे (व्हायोलीन), किरण वेहेले (कीबोर्ड), अभिषेक प्रभू (बेस गिटार) आणि सचिन नाखवा (ड्रम्स) हे कलाकार सहभागी झाले. याप्रसंगी रंगायतनच्या वाटचालीची माहिती देणारी ध्वनीचित्रफितही दाखवण्यात आली.
लोकार्पण सोहळ्यानंतर फोकलोक या युवा कलाकारांच्या लोकसंगीतावर आधारित कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम रसिकांसाठी विनामूल्य होता. त्यास रसिकांनी भरघोस प्रतिसाद दिला.
