
- एकूण 98,899 प्रकरणेनिकाली, 1 अब्ज 12 कोटी 30 लक्ष 84 हजार 636/- एवढया रकमेची तडजोड
- 30 वर्षे, 20 वर्षे, 10 वर्षे अशी वर्षानुवर्षे जुनी प्रलंबित 318 प्रकरणे निकाली
- प्रलंबित 27 हजार 118 व दावा दाखलपूर्व 71 हजार 781 अशी एकूण 98 हजार 899 प्रकरणे निकाली
- त्यामध्ये 1 अब्ज 12 कोटी 30 लाख 84 हजार 636एवढ्या रकमेची तडजोड
ठाणे (दि.15) : न्यायालयीन वाद कायमस्वरूपी व जलद निकाली काढण्यासाठी लोकअदालत व मध्यस्थी प्रक्रिया हे सर्वात प्रभावी माध्यम आहे. या माध्यमातून वाद कायमस्वरूपी व जलद गतीने मिटला जातो. ठाणे जिल्ह्यात मोटार अपघाताच्या नुकसान भरपाईची एकूण 131 प्रकरणे तसेच Debts Recovery Tribunal (DRT) प्राधिकरणाची 137 प्रकरणे सामंजस्याने मिटल्याने, त्यातील कुटुंबियांना व वारसांना त्वरीत नुकसान भरपाई मिळालेली आहे. लोकअदालतमुळे वेळेची व पैशांची बचत होते, व या बाबींचा समाजात प्रसार झाल्याने मोठ्या प्रमाणात लोकन्यायालयास सातत्याने यश मिळत आहे, असे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण ठाणे सचिव ईश्वर सुर्यवंशी यांनी कळविले आहे.
10 मे 2025 रोजीच्या “राष्ट्रीय लोकअदालत” मध्ये पुढील बाबींमध्ये ठाणे जिल्हा आघाडीवर
ठळक वैशिष्टये
1) राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार प्रत्येक वर्षात चार राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन केले जाते. दि.10 मे,2025 रोजी झालेल्या राष्ट्रीय लोकअदालत ही या वर्षातील दुसरी लोकअदालत होती.
2) अत्यंत जुनी प्रकरणे :- या राष्ट्रीय लोकअदालतमध्ये अत्यंत जुनीवर्षानुवर्षे प्रलंबित असलेली 5वर्षे, 10वर्षे, 20 वर्षे व 30 वर्षे जुनी असलेली एकूण 318 प्रकरणे निकाली काढण्यात यश.
3) मोटार अपघात दाव्यांपैकी एका प्रकरणामध्ये 2 कोटी 2 लाखरूपयांची तडजोड:-ठाणे जिल्ह्यात मोटार अपघात दाव्याची एकूण 131 प्रकरणे तडजोडीने निकाली. एकूण 14 कोटी 40लाख 38 हजार रूपयांची तडजोड.Debts Recovery Tribunal (DRT) प्राधिकरणाद्वारे 137 प्रकरणे निकाली.एकूण तडजोडीची रक्कम रू.39,24,41,133/-. वैवाहिक प्रकरणे :- कौटुंबिक न्यायालयातील वैवाहीक प्रकरणांमधीलवाद सामंजस्याने मिटविण्यासाठी व कौटुंबिक संबंध पुनःप्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केले गेले. त्यामध्ये वैवाहीक वादाच्या एकूण 61 प्रकरणांमध्ये यशस्वी समेट. त्यापैकी 10 प्रकरणांत पती-पत्नी एकत्र नांदावयास गेले.N.I. Act कलम 138 च्या धनादेश प्रकरणांतील जुनी प्रलंबित 685 प्रकरणे निकाली होऊन त्यात 10,77,87,673/- रक्कमेची तडजोड.किरकोळ स्वरूपाच्या फौजदारी प्रकरणात गुन्हा कबुलीस प्रतिसाद मिळाला असून जवळपास 21,409 आरोपींनी न्यायालयासमोर गुन्हा कबुल करून दंडाची रक्कम रूपये 1,05,49,000/- जमा केली.प्रॉपर्टी टॅक्स/रेव्हेन्यु ची दाखलपूर्व 60409 प्रकरणे निकाली.तडजोडीची रक्कम रू.2,10,68,967/-. ठाणे जिल्ह्यातील राष्ट्रीय लोकअदालतीस जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद. राष्ट्रीय लोकअदालतमध्ये जनतेचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद हा प्रसारमाध्यमांच्या सहयोगाने.
मागील पाच राष्ट्रीय लोकअदालतीप्रमाणेच या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये सुध्दा जुन्या प्रकरणांना प्राधान्य देवून ती प्रकरणे निकाली काढण्याबाबत आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी जिल्हा न्यायालय, पोलीस प्रशासन, जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या सदस्यांची समिती गठीत करण्यात आली होती व त्याद्वारे नोटीस बजावणीकामी विशेष पथक नेमून समन्स व नोटीसची बजावणी करण्यात आली. व त्यामुळे जुनी 318 प्रकरणे निकाली काढण्यात यश मिळाले.
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार तसेच प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, ठाणे तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, ठाणे श्रीनिवास ब्रि. अग्रवालयांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा व सत्र न्यायालय, ठाणे अंतर्गत ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील जिल्हा न्यायालय व सर्व तालुका न्यायालये व संलग्न न्यायालयांमध्ये शनिवार, दि.10 मे 2025 रोजी “राष्ट्रीय लोकअदालत” चे आयोजन करण्यात आले होते.
मागील काही राष्ट्रीय लोकअदालतीचा आलेख पाहिला असता नागरीकांना राष्ट्रीय लोकअदालतीचे महत्व पटल्याचे प्रकर्षाने दिसून येते. प्रसारमाध्यमे तसेच समाजातील प्रत्येक स्तरामध्ये करण्यात आलेल्या कायदेशीर जनजागृती शिबीरामुळे सामान्य जनतेस लोकअदालत व त्यातून होणारा न्यायनिर्णयाचे महत्व प्रकर्षाने जाणवत असल्याने दिवसेंदिवस लोकअदालत तसेच मध्यस्थी प्रक्रिया याकडे नागरीकांचा कल मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे दिसून येते व त्याचेच उत्तम उदाहरण म्हणजे या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये जिल्हा न्यायालय व अनिधस्त तालुका न्यायालयांची मिळून एकूण 105 पॅनल्सद्वारे लोकअदालतमध्ये एकूण 27118 प्रलंबित प्रकरणे व 71781 दावा दाखल पूर्व प्रकरणे असे एकूण 98899 प्रकरणे आपापसात तडजोडीने निकाली काढण्यात यश मिळाले.
या लोकअदालतीस ठाणे जिल्ह्यातील सर्व सन्माननीय न्यायिक अधिकारी, वकील संघटनेचे अध्यक्ष प्रशांत कदम, वकील संघटनेचे पदाधिकारी, सरकारी अभियोक्ता, पोलीस उपआयुक्त, वाहतुक पंकज शिरसाट तसेच पोलीस प्रशासन, महानगरपालिका, राष्ट्रीयकृत बँका, खाजगी वित्तीय संस्था, इन्शुरन्स कंपनी, न्यायालयीन कर्मचारी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे कर्मचारी, संगणक कक्षातील कर्मचारी यांच्या परिश्रमाने व उत्स्फूर्त प्रतिसादाने मोठ्या प्रमाणात प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यात यश संपादन झाले आहे, अशी माहिती प्राधिकरणाचे सचिव ईश्वर सुर्यवंशी यांनी दिली.
राष्ट्रीय लोकअदालत यशोगाथा
मयतांचे वारस व जखमींना दिलासा :-ठाणे जिल्ह्यात मोटार अपघात दावा नुकसान भरपाई प्रकरणात एकूण 131 प्रकरणांत तडजोड होवून पिडीतांना रक्कम रु.12 कोटी 70 लाख 38 हजार रूपयांची भरपाई मंजूर करण्यात आली. या प्रकरणांपैकी ठाणे मुख्यालयातील पॅनल मा.न्यायाधीश श्रीमती सोनाली एन.शाह यांच्या पॅनलकडे एकूण 95 प्रकरणांमध्ये तडजोड होवून रू.9 कोटी 27 लाख 08 हजार एवढी नुकसान भरपाई पिडीतांना मंजूर करण्यात आली.
या पॅनलकडील एका प्रकरणात मोटार अपघातातात मृत्यु पावलेल्या व्यक्तींच्या वारसांना गो डिजिटल इन्शुरन्स कंपनीकडून उच्चतम रक्कम नुकसान भरपाई म्हणून 2 कोटी 2 लाखांचा धनादेश देण्यात आला. या दाव्यामधील मृत्यु पावलेली 44 वर्षीय व्यक्ती परिमल इस्टेट प्रा.लि.कंपनीमध्ये मॅनेजर म्हणून कार्यरत होते.बुलेट मोटारसायकलवर मागच्या सीटवर बसले असताना मोटारसायकल स्लीप होवून या व्यक्तीला मार लागून तिचा दुर्देवी मृत्यू झाला होता.या दाव्यामध्ये इन्शुरन्स कंपनीतर्फे अॅड. केशव पुजारी यांनी व पक्षकारांतर्फे अॅड. जी. ए. विनोद यांनी काम पाहिले.
वैवाहिक वाद प्रकरणांत पुनर्मिलन करण्यात यश
कौटुंबिक न्यायालय, बेलापूर, कौटुंबिक न्यायालय, ठाणे, पालघर, बेलापूर न्यायालय व उल्हासनगर न्यायालय येथिल एकूण 10 वैवाहिक प्रकरणात पुन्हा नव्याने संसार जुळले. त्यापैकी कौटुंबिक न्यायालय, बेलापूर येथील न्यायाधीश आर.आर तेहरा यांच्या न्यायालयातील 04 जोडप्यांनी घटस्फोटासाठी टाकलेले अर्ज एकत्र मागे घेत पुढील आयुष्य एकत्रितपणे नांदण्याचा व नव्याने संसार सुरू करण्याचा निर्णय घेतला तसेच कौटुंबिक न्यायालय, ठाणे येथे 02 व भिवंडी न्यायालयात 03 वैवाहिक प्रकरणात पुन्हा नव्याने संसार जुळले. शहापूर येथे सन 2022 पासून चालू असलेल्यापती-पत्नीच्या घटस्फोटाच्या अर्जामध्ये मध्यस्थी प्रक्रियेचा अवलंब करून मध्यस्थी प्रक्रियेद्वारे या प्रकरणातील जोडप्याने पुढील आयुष्य एकत्रितपणे नांदण्याचा निर्णय घेवून त्यांच्या संसाराला नवीन पालवी फुटली, असे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, ठाणे सचिव ईश्वर .सुर्यवंशी यांनी कळविले आहे.