
ध्वनी प्रदूषणाबाबत स्थानिकांनी केली तक्रार
ठाणे (०3) : महात्मा फुले मंडईतील मसाला मार्केटमधील सात मसाला गिरण्या ठाणे महापालिकेने सील केल्या आहेत. या गिरण्यांमध्ये असलेल्या मोठ्या यंत्रांमुळे मोठ्या प्रमाणावर ध्वनी प्रदूषण होत असल्याची तक्रार स्थानिक नागरिक व मंडईतील सदस्यांनी केली होती.
स्थानिकांनी केलेल्या तक्रारींची दखल घेऊन महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी महापालिका अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष पाहणी करून कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार, परिमंडळ उपायुक्त शंकर पाटोळे, मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान, सहाय्यक आयुक्त (स्थावर विभाग) राजेश सोनावणे, नोपाड्याचे सहाय्यक आयुक्त सोपान भाईक यांनी या मसाला गिरण्यांची पाहणी केली.
या गिरण्यांमध्ये मोठी यंत्रसामुग्री असल्याने या गिरण्या मंडईएेवजी औद्योगिक क्षेत्रात असायला हव्यात. या यंत्रांमुळे मोठ्या प्रमाणावर ध्वनी प्रदूषण होत होते. सुमारे १०० डेसिबलपर्यंत ध्वनीपातळी येथे नोंदवण्यात आली. त्यांना मार्च-२०२५मध्ये ध्वनी प्रदूषणाबाबतची नोटीसही बजावण्यात आली होती. तरीही या गिरण्या सुरूच होत्या. त्यामुळे ध्वनी प्रदूषण नियंत्रणाचे पालन करत नसल्याने त्या सील करण्यात आल्याची माहिती उपायुक्त शंकर पाटोळे यांनी दिली.