
गुणवंत सफाई कामगारांचा हि करण्यात आला सत्कार
ठाणे ( 1 मे ) : महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 66वा वर्धापन दिन ठाणे महापालिकेतर्फे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पाचपाखाडी येथील महापालिका मुख्यालयाच्या प्रांगणात सकाळी 7:15 मिनिटांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी राष्ट्रध्वज फडकावून मानवंदना दिली. राष्ट्रगीत व राज्यगीत यांच्या सुरावटींच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त आयुक्त (1) संदीप माळवी आणि अतिरिक्त आयुक्त (2) प्रशांत रोडे यांच्यासह सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी राष्ट्रध्वजाला सलामी दिली.
ध्वजवंदनानंतर, महापालिका आयुक्त श्री. राव यांच्या हस्ते, आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या निमित्ताने, गुणवंत सफाई कामगारांचा सत्कार करण्यात आला. प्रकाश बाळकृष्ण पोतदार, किशोरी बुधाजी दळवी, विशाल सखाराम मोहिते, सुरेश काळू चौधरी, सरूबाई धनराज शेवाळकर, नागेश श्याम कांबळे, प्रतिभा गजानन गायकर, लता रमेश कांबळे, मेघा लक्ष्मण दुधावडे, मयुरी महेश मोहिते, गणेश शिवाजी शिदरडी, नागनाथ गणपत वंचेवाड या १२ सफाई कर्मचाऱ्यांना शाल, सन्मानचिन्ह आणि तुळशीचे रोप देऊन सन्मानित करण्यात आले.
ध्वजवंदन सोहळ्यानंतर, कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात महनीय व्यक्तींच्या प्रतिमांना आयुक्त सौरभ राव यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यावेळी, अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी आणि अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे, उपायुक्त जी. जी. गोदेपुरे, मनीष जोशी, उमेश बिरारी, शंकर पाटोळे, मधूकर बोडके, सचिन सांगळे, टीएमटीचे व्यवस्थापक भालचंद्र बेहरे, सहाय्यक आयुक्त सोपान भाईक, भालचंद्र घुगे, उपनगर अभियंता गुणवंत झांब्रे, शुभांगी केसवानी आदी मान्यवर उपस्थित होते.
त्यानंतर, मासुंदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराज आणि कोर्ट नाका व ठाणे स्टेशन येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यावेळी, उपायुक्त जी. जी. गोदेपुरे, शंकर पाटोळे आणि सहाय्यक आयुक्त सोपान भाईक उपस्थित होते.
: THANE RADIO