
शपथ ग्रहण, नागरी सुविधा केंद्र पाहणी, जागरुकता मेळावा यांचे आयोजन
ठाणे (29 : महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५च्या अमलबजावणीस दहा वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ठाणे महापालिकेतर्फे सोमवार, 28 एप्रिल, 2025 रोजी सेवा हक्क दिन साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने, महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचारी यांनी शपथ घेतली, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नागरी सुविधा केंद्राची पाहणी केली. तसेच, महिलांमध्ये या कायद्याविषयी जागरूकता निर्माण व्हावी यासाठी मेळाव्याचेही आयोजन करण्यात आले होते.
सेवा हक्क दिनाच्या निमित्ताने महापालिका मुख्यालय येथील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे महापालिका अधिकारी आणि कर्मचारी यांनी या कायद्याअंतर्गत, शासनाच्या सेवा पारदर्शक पद्धतीने विहीत कालमर्यादेत व सौजन्याने पात्र नागरिकांना देण्याकामी सोपविण्यात आलेली जबाबदारी पूर्ण प्रामाणिकपणे, निष्ठेने, सचोटीने, संवेदनशीलतेने व तत्परतेने पार पाडण्यासाठी कटिबद्ध राहण्याची शपथ घेतली. या प्रसंगी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त जी. जी. गोदेपुरे, उमेश बिरारी आणि अनघा कदम, आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे यांच्यासह महापालिका अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
त्यानंतर, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी महापालिका मुख्यालयातील तळमजल्यावरील नागरी सुविधा केंद्राला भेट दिली. तेथील कर्मचाऱ्यांशी संवाद साधून नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सुविधांची माहिती घेतली. तसेच, त्यासंदर्भात, सूचनाही केल्या. त्यावेळी, उपायुक्त जी. जी. गोदेपुरे, उमेश बिरारी, सचिन सांगळे, अनघा कदम, आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे, महिला व बालविकास अधिकारी दयानंद गुंडप, संगणक अधिकारी नितीन डुंबरे आदी उपस्थित होते.
सेवा हक्क दिनाच्या निमित्ताने, महिलांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी मेळाव्याचे आयोजन कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात करण्यात आले होते. या मेळाव्यात, उपायुक्त उमेश बिरारी यांनी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५मधील तरतुदींची माहिती दिली. महापालिकेकडून दिल्या जाणाऱ्या सेवा, त्याबद्दल निश्चित केलेल्या कालमर्यादा आदी गोष्टी समजून सांगितल्या. उपायुक्त जी. जी. गोदेपुरे यांनी सेवा हक्काविषयी राज्य शासनाची भूमिका, महापालिकेने हाती घेतलेले उपक्रम याचे विवेचन केले. तर, उपायुक्त अनघा कदम यांनी सेवा हक्क दिनाच्या मेळाव्यास उपस्थित राहिलेल्या महिलांचे आभार मानले. तसेच, सेवा हक्कांबाबतचा संदेश कुटुंबात, परिसरातही पोहोचवावा, असे आवाहनही केले.