
जगप्रसिद्ध अश्या शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेसाठी साई संस्थानने मोठा निर्णय घेतलाय. आता साई संस्थानच्या अधिकृत वेबसाइटवरून विविध सुविधा बुक करून शिर्डीला येणाऱ्या भाविकांना 5 लाख रुपयांचा अपघाती विमा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती, साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली.यासाठी त्यांनी एक प्रसिद्धी पत्रक देखील काढलं आहे.
शिर्डीचे साई मंदिर हे देश-विदेशातील लाखो भक्तांचे श्रद्धास्थान आहे. येथे विविध मार्गांनी दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांपैकी जे भाविक साईबाबा संस्थानच्या http://online.sai.org.in या अधिकृत वेबसाइटवर दर्शन, भक्त निवास, अभिषेक पूजा, अन्य सेवा बुकिंग करतील त्यांच्यासाठी हा विमा लागू असेल. भक्तांनी ऑनलाइन बुकिंग केल्यानंतर ते घरून शिर्डीला पोहोचेपर्यंतच्या प्रवासादरम्यान अपघात झाल्यास प्रत्येकी 5 लाख रुपयांचा विमा संरक्षण मिळणार असल्याची माहिती, गोरक्ष गाडीलकर यांनी दिली.
