
ठाणे (दि.25) : डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) तर्फे घेण्यात येत असलेल्या यु.पी.एस.सी. नागरी सेवा पूर्व तथा मुख्य परीक्षेचे पूर्वतयारी प्रशिक्षण या योजनेंतर्गत केंद्रीय सशस्त्र पोलीस दल 2023 साठी बार्टीच्या पाच विद्यार्थ्यांची असिस्टंट कमांडंट पदी निवड करण्यात आली आहे. येत्या मे अखेरपर्यंत त्यांचे हैद्राबाद येथे CAPF (Central Armed Police Force) साठी ट्रेनिंग सुरु होणार आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये व्यंकट प्रकाश गायकवाड – रॅंक 39, अजित सूर्यकांत खरात – रॅंक 220, मयुर दिपक रंगारी – रॅंक 248, रोशन अरविंद कडू रॅंक – 284, अजय इट्खरे – रॅंक 292 या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
संघ लोकसेवा आयोग (युपीएससी) केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात (Central Armed Police Force) भरतीसाठी (असिस्टंट कमांडंट) परीक्षा आयोजित करते. CAPF हे गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या केंद्रीय पोलीस संघटनांचे सामूहिक नाव आहे. या दलांमध्ये सीमा सुरक्षा दल (BSF), केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF), केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF), भारत-तिबेट सीमा पोलीस (ITBP) आणि सशस्त्र सीमा बल (SSB) यांचा समावेश होतो. या दलांची भूमिका प्रामुख्याने अंतर्गत धोक्यांपासून राष्ट्रीय हिताचे रक्षण करणे आहे.
युपीएससी द्वारा आयोजित केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (असिस्टंट कमांडंट) परीक्षेमार्फत CAPF मध्ये अधिकाऱ्यांची भरती केली जाते. बार्टी मार्फत अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी यु.पी.एस.सी.-नागरी सेवा पूर्व तथा मुख्य परीक्षेचे पूर्वतयारी प्रशिक्षण योजनेंतर्गत पूर्व तसेच मुख्य परीक्षेचे प्रशिक्षण दिल्या जाते. प्रशिक्षण योजनेत विद्यार्थ्यांची निवड गुणवत्तेच्या आधारावर केली जाते. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना मासिक विद्यावेतन, मोफत प्रशिक्षण, प्रवास भत्ता दिल्या जातो.
बार्टीमार्फत यु.पी.एस.सी.नागरी सेवा पूर्व तथा मुख्य परीक्षेचे पूर्वतयारी प्रशिक्षण योजनेत दिल्ली येथील कोचिंग संस्थामध्ये कोचिंग, नागरी सेवा (प्राथमिक) परीक्षा उत्तीर्ण झालेल्या आणि (मुख्य) परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना आर्थिक सहाय्य. व्यक्तिमत्व चाचणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना आर्थिक सहाय्य योजना राबविल्या जातात. या सर्व योजनांची विस्तृत माहिती बार्टीच्या www.barti.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांनी या सर्व योजनांची माहिती घेऊन त्याचा लाभ, असे आवाहन बार्टीचे महासंचालक सुनील वारे यांनी केली आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांचे मनोगत:-
बार्टीच्या विद्यावेतनाने परिस्थिती सुधारली;रोशन अरविंद कडू, अमरावती
माझे आईवडील शेतमजूर, घरी तीन भावंडे, टीनाचे छप्पर असलेले घर, जे कधीही उडायचे, आईच्या प्रेरणेने शिकलो, अमरावती जिल्ह्यात शिक्षणासाठी गावोगाव भटकंती केली. मित्राकडून बार्टी बाबत माहिती मिळाली. युपीएससी योजनेबाबत कळले. अभ्यास सुरु केला. पण आर्थिक तंगीने हैराण केले होते. बार्टीच्या युपीएससी योजनेत निवड झाली. प्रशिक्षणा दरम्यान मिळणाऱ्या विद्यावेतनाने परिस्थिती सुधारली. आज बार्टीमुळे आईवडीलांचे व माझे ऑफिसर होण्याचे स्वप्न साकार करु शकलो.
बार्टीच्या प्रशिक्षणाने आत्मविश्वास दिला; व्यंकेट प्रकाश गायकवाड, लातूर
माझे आईवडील वीटभट्टीच्या कामाला जातात. घरी आम्ही सहा भावंड. त्यात मी लहान. खूप पायपीट करुन शिकलो. आईवडीलांच्या श्रमाचे मोल फेडायचे होते. म्हणून हॉटेलात काम केलं, लातुरला मित्रांच्या सोबतीने स्पर्धा परीक्षेची तयारी केली. तरी दिल्लीसारख्या ठिकाणी या स्पर्धेत टिकू की नाही अशी भीती होती. पण बार्टीने दिलेल्या प्रशिक्षणाने आत्मविश्वास वाढला. विद्यावेतनाने परिस्थिती सुधारली. केवळ बार्टीमुळे मी आज ही झेप घेऊ शकलो.