
- मुरबाडमधील ५०० शेतकऱ्यांना दिलासा
- आमदार संजय केळकर यांनी अधिवेशनात उठवला आवाज
सन २०२०-२१ पासून मुरबाडमधील भात उत्पादक शेतकऱ्यांचा रखडलेला बोनस लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. आमदार संजय केळकर यांनी अधिवेशनात वाचा फोडल्यानंतर मंत्री महोदयांनी याबाबत माहिती दिली.
भात उत्पादक शेतकऱ्यांना नाफेड किंवा आदिवासी विकास महामंडळामार्फत क्विंटलमागे ५०० रुपये बोनस देण्यात येतो. मात्र मुरबाडसारख्या आदिवासी दुर्गम भागातील सुमारे ५०० भात उत्पादक शेतकऱ्यांना सन २०२०-२१ पासून बोनस मिळालेला नसल्याची बाब आमदार संजय केळकर यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. ऑनलाईन नोंदणी करताना अडथळे निर्माण झाल्याने या शेतकऱ्यांचा लाखो रुपयांचा बोनस रखडला असून मुरबाड भात उत्पादक संघटनेने शासनाकडे याबाबत पाठपुरावा केला होता. मात्र अद्याप त्यावर निर्णय झाला नसल्याचे सांगून श्री.केळकर यांनी या बोनससाठी वित्त विभागाने मंजुरी दिली आहे का आणि बोनस कधीपर्यंत मिळेल असे प्रश्न सभागृहात उपस्थित केले.
यावर उत्तर देताना मंत्रिमहिदयांनी बोनस रखडल्याची बाब सत्य असल्याचे सांगितले. आतापर्यंत ३२६३ शेतकऱ्यांची नोंदणी झालेली असून त्यांना बोनस देण्यात आला आहे. उर्वरित ५०० शेतकऱ्यांचा बोनस देण्यास. वित्तीय मंजुरी मिळाली असून हा प्रश्न कॅबिनेट बैठकीत ठेवण्यात आला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी मिळाल्यानंतर लगेच रखडलेला ७९ लाखांचा बोनस शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल, अशी माहिती मंत्रीमहोदयांनी दिली.