
कॉमेडियन कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर एक कविता सादर केली आहे. त्याने आपल्या कार्यक्रमात महाराष्ट्राच्या राजकारणावर भाष्य करत एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी कुणाल कामराचा कविता सादर करतानाचा व्हिडीओ ट्विट केला आहे. “कुणाल की कमाल. जय महाराष्ट्र”, असं संजय राऊत व्हिडीओसोबत म्हणाले आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात तीन वर्षांपूर्वी ज्या घडामोडी घडल्या त्यावर कुणालने भाष्य करत एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.
उदय सामंत यांचा मोठा इशारा
कुणाल कामाराच्या कवितेवरुन राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. मंत्री उदय सामंत यांनी कुणाल कामरा याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला आहे. “पूर्ण गाणं ऐकून आमचे आमदार कुणाल कामरावर एफआयआर दाखल करण्याच्या मनस्थितीत आहेत. एकनाथ शिंदे यांच्याबाबत बदनामकारक ते गाणं असेल आणि अशा पद्धतीने कुणी गाणं म्हणायला लागलं तर आम्ही आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते कुणीही ऐकून घेणार नाहीत. त्याच्यावर पोलिसांकडून कारवाई करण्याची मागणी करु”, अशी भूमिका उदय सामंत यांनी मांडली आहे.