
ठाणे: स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या ‘हर घर तिरंगा’ उपक्रमांतर्गत ठाणे महानगरपालिकेच्या बल्लाळ सभागृहात मनपा शाळांमधील विद्यार्थ्यांचा विशेष देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांनी कलागुणांच्या माध्यमातून देशभक्ती, राष्ट्रप्रेम आणि तिरंग्याविषयीचा अभिमान व्यक्त केला.
या कार्यक्रमास महापौर शर्मिला पिंपळोलकर, उपमहापौर कृष्णा पाटील, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, शिक्षणाधिकारी शेषराव बढे यांच्यासह मनपा शाळांचे शिक्षक, विद्यार्थी आणि अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना वृद्धिंगत व्हावी, या उद्देशाने तिरंगा राखी अभियान, सीमेवरील जवानांना पत्र, सायकल तिरंगा रॅली यांसह विविध उपक्रम राबविण्यात आले.
कार्यक्रम प्रसंगी मनपा शाळांच्या विद्यार्थ्यांनी विविध सादरीकरणे केली:
शाळा क्र. ११२: ‘माँ से है माटी, माँ से है तिरंगा’ वर आधारित सादरीकरण.
शाळा क्र. २९: ‘बढ़ते चलो’ गीतावर देशभक्तीपर सादरीकरण.
शाळा क्र. ६: ‘तिरंगा’ गाण्यावर नृत्य.
शाळा क्र. १२६: ‘हर घर तिरंगा’ संकल्पनेवर आधारित प्रभावी पथनाट्य.
शाळा क्र. ९८: ‘ऐ वतन, वतन मेरे’ गीताचे सादरीकरण.
शाळा क्र. ५३: देशभक्तीपर फ्यूजन साँग.
शाळा क्र. ७३ व मीनाताई ठाकरे परिचर्या प्रशिक्षण संस्था: ‘देस रंगीला’ व इतर देशभक्तीपर नृत्य.

या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा राष्ट्रीय अभियानातील सहभाग अधिक व्यापक झाला असल्याचे नमूद करत महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी सर्वांना ८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
‘हर घर तिरंगा’च्या माध्यमातून प्रत्येक घरात तिरंगा आणि प्रत्येक मनात देशप्रेम हा संदेश पोहोचविण्याचा प्रयत्न ठाणे महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आला. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शिक्षक सुरेश पाटील यांनी केले.