
# आमचे पाणी, वीज पळवून आम्हालाच त्रासदायक ठरणारा प्रकल्प हाणून पाडणार – मनोज प्रधान
ठाणे – डेटा सेंटर विरोधात वेक अप ठाणेकर या संस्थेने दिलेल्या हाकेला हजारो ठाणेकरांनी प्रतिसाद दिला. शनिवारी सकाळी दहा ते बारा वाजेच्या दरम्यान हजारो ठाणेकरांनी प्रस्तावित अमेझाॅन डेटा सेंटरच्या बाहेर एकवटून डेटा सेंटरला हद्दपार करण्याचा निर्धार केला. दरम्यान, या आंदोलनात सहभागी झालेल्या मनोज प्रधान यांनी डेटा सेंटरविरोधातील हा लढा अराजकीय असणार असून आमचे पाणी, वीज पळवून आम्हालाच त्रासदायक ठरणारा प्रकल्प हाणून पाडणार असल्याचा इशारा दिला.
बाळकूम येथील 53 एकर भूखंडावर अद्ययावत डेटा सेंटर उभारण्यात येणार आहे. या डेटा सेंटरसाठी दररोज 12 दशलक्ष लिटर्स शुद्ध पाणी आणि अमर्याद विजेचा पुरवठा करण्यात येणार आहे. तसेच, या डेटा सेंटरमधून वर्षाचे 365 दिवस, दिवसाचे 24 तास 90 डिसेबल आवाज परिसरात गुंजत राहणार आहे. या आवाजाचा दुष्परिणाम गर्भवती महिला, लहान मुले आणि वृद्धांना सहन करावा लागणार आहे. त्याविरोधात वेक अप ठाणेकरचे दयानंद नेने, साधनाताई प्रधान, राजेश कदम, मेघना शेट्टी, जतीन कोठारे, अनुराधा रोडे आदींनी मागील आठवड्यात जनआंदोलन उभे करण्याचा निर्णय जाहीर केला होता. मागील गुरूवारी या शिष्टमंडळाची अमेझाॅनच्या प्रतिनिधींसोबत ठामपा आयुक्तांच्या दालनात बैठकही पार पडली होती. मात्र, अमेझाॅनकडून दिशाभूल केली जात असल्याने वेक अप ठाणेकरने नागरिकांना रस्त्यावर उतरण्याचे आवाहन केले होते.
आज सकाळी दहा वाजता बाळकूम येथील प्रस्तावित डेटा सेंटरबाहेर हातात फलक घेऊन अबालवृद्धांसह हजारो नागरिकांनी निषेधाचा सूर आळवला. आजूबाजूच्या सोसायट्या, बाळकूम गाव, कोलशेत – ढोकाळी येथील हजारो नागरिक या आंदोलनात सहभागी झाले होते. या सर्व आंदोलकांनी हा डेटा सेंटर बाळकूम येथे होणारच नाही, यासाठी आम्ही यापेक्षा उग्र आंदोलन छेडणार आहोत, असा इशारा दिला.
या प्रसंगी प्रसारमाध्यमांशी बोलताना मनोज प्रधान म्हणाले, ठाणेकरांचे पाणी, वीज जबरदस्तीने घेऊन अॅमेझॉन आपल्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी उपक्रमांतर्गत ठाण्यात ५० निवारे बांधणार आहे. हे निवारे फुकट बांधण्यात येणार नाहीत. त्या बदल्यात ठाण्याचे पाणी , वीज जबरदस्तीने घेतली जाणार आहे. म्हणजेच या प्रकरणात “देवाण- घेवाण” झाली असल्याची दाट शक्यता आहे. प्रस्तावित प्रकल्पाच्या ०१ किमीच्या परिघात आठपेक्षा जास्त मोठे गृहनिर्माण संकुल, पाच शाळा आणि तीन रुग्णालये आहेत, ज्यात प्रकल्पाच्या जागेपासून ४०० मीटरच्या आत असलेल्या एका बाल रुग्णालयाचाही समावेश आहे. जगभरातील मोठे डेटा सेंटर्स ९० डेसिबल्सपर्यंतचा सततचा आवाज निर्माण करू शकतात.
“इतर उद्योगांच्या उलट, डेटा सेंटर्समधून येणारा आवाज हा सततचा असतो आणि तो कधीही थांबत नाही. याचा परिसरातील नागरिक आणि प्राण्यांवर काय परिणाम होऊ शकतो, हे समजून घेण्याची गरज आहे. या डेटा सेंटरचा पर्यावरणावरही याचा परिणाम होऊ शकतो, असे नमूद करून गेले अनेक दिवस ठाण्याचा पारा चाळीशी गाठत आहे. आता या डेटा सेंटरमुळे आसपासच्या भागातील तापमान ३°C ते ५°C पर्यंत वाढू शकते. हे धोकादायक आहे, कारण स्थानिक रहिवाशांशी याबाबत कोणतीही सल्लामसलत केलेली नाही आणि या डेटा सेंटरमुळे आरोग्याला गंभीर धोके निर्माण होऊ शकतात, असे प्रधान म्हणाले.
या आंदोलनात नर्मदा बचाव आंदोलनातील सामाजिक कार्यकर्ते संजय मं.गो. , जगदीश खैरालिया, ॠता आव्हाड आदीही सहभागी झाले होते.