
जिद्द, मेहनत, चिकाटीने अभ्यास करा – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
ठाणे (15) : गुलाबपुष्प, नवी कोरी पुस्तक, खाऊ आणि मुलांनी शाळेत पहिलं पाऊल टाकत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शाळा क्र. 23 च्या विद्यार्थ्यानी शाळेत प्रवेश केला. आज ठाणे महानगरपालिकेच्या सर्व शाळांमध्ये पदाधिकारी, अधिकारी यांच्या उपस्थितीत शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना जिद्द, मेहनत, चिकाटीने अभ्यास करा तुम्ही निश्चितच पुढे जाल असा मोलाचा सल्ला दिला.
ठाणे महानगरपालिका शाळा क्र. 23 किसननगर येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महापौर शर्मिला पिंपळोलकर, शिवसेना गटनेते पवन कदम नगरसेवक राम रेपाळे, नगरसेविका संध्या मोरे, सुखदा मोरे, एकता भोईर, डॉ. दर्शना भोईर, महापालिका आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, उपआयुक्त डॉ. मिताली संचेती, सहायक आयुक्त राजेश सोनावणे, शिक्षणाधिकारी शेषराव बढे, माजी नगरसेवक डॉ. जितेंद्र वाघ, शिक्षक सेनेचे पदाधिकारी, शाळेचे मुख्याध्यापक दीपक मोराणकर यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
उन्हाळ्याची सुट्टी संपून आज शाळा सुरू होत आहेत, मी विद्यार्थ्यांना भेटायला आलो असून शाळा ही आपल्या भविष्याची दारे आहेत. आई वडील आपल्याला जन्म देतात, पण शिक्षक आकार देण्याचं काम करतात. नवीन शाळेत आनंद तर असतोच पण टेन्शन पण असते, परंतु टेन्शन न घेता बिनधास्तपणे अभ्यास करा असा सल्ला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विद्यार्थ्यांना दिला. एखादा विषय समजला नाही तर शिक्षकांना परत परत प्रश्न विचारा, जो प्रश्न विचारतो तो हुशार विद्यार्थी असतो, जिद्द, मेहनत, चिकाटीने अभ्यास करा, आपण निश्चितच पुढे जाल असेही त्यांनी सांगितले. यावेळी विद्यार्थी ही उपमुख्यमंत्री यांचे मार्गदर्शन लक्षपूर्वक ऐकत दाद देत होते.

विद्यार्थी ही देशाची संपत्ती आहे, त्यांना आकार देण्याचे, सुजाण नागरिक घडविण्याचे काम हे शिक्षकांचे आहे. मातृभाषेतील शिक्षणाने विद्यार्थ्यांची आकलनशक्ती वाढते. शिक्षक देखील टेक्नोसॅव्ही झाले आहे, त्यामुळे स्पर्धात्मक युगात शिक्षकांनी विद्यार्थ्यांना जे नवीन आहे अशी माहिती दिली पाहिजे अशा सूचना त्यांनी शिक्षकांना दिल्या. शाळा तसेच शाळेचा परिसर स्वच्छ असला पाहिजे, पिण्याचे पाणी तसेच स्वच्छतागृह स्वच्छ असली पाहिजेत हे तपासण्यासाठी शाळांमध्ये व्हिजीलन्स स्कॉड पाठविण्याच्या सूचना त्यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांना दिल्या. जर काही त्रुटी असतील तर त्या दूर करा, सर्व सुखसोई विद्यार्थ्यांना मिळाल्या पाहिजेत असेही त्यांनी सांगितले.
महापालिका, जिल्हा परिषद किंवा सरकारी शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी न्यूनगंड बाळगू नये, देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, माजी राष्ट्रपती डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम, शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर या मोठ्या व्यक्तीही सरकारी शाळांमधून शिकले आहेत. शिक्षणाची गुणवत्ता आणि शिक्षकांची बांधिलकी महत्त्वाची असून शाळेच्या नावावरून भेदभाव करू नये, असेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नमूद केले.

उपमुख्यमंत्र्यांनी जागवल्या शाळेच्या आठवणी
मी सुद्धा किसननगर शाळा क्र. 23 चा विद्यार्थी आहे, मला या शाळेचा सार्थ अभिमान आहे असे सांगत उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी शाळेच्या आठवणी जागवल्या. त्यावेळी रघुनाथ परब, निकम सर, राऊत बाई आम्हाला होत्या, त्यांची आज आठवण होते, पूर्वी ही शाळा म्हणजे चाळ होती. त्याला दरवाजे नव्हते. आम्ही साफसफाई करुन शाळेत बसायचो, याचा वेगळा आनंद होता. महापौर शर्मिला पिंपळोलकर या देखील याचा शाळेच्या माजी विद्यार्थींनी आहेत, मनपा शाळेत शिक्षण घेतलेले विद्यार्थी आज अनेक मोठ्या पदावर काम करत आहेत असे त्यांनी यावेळी नमूद केले.
पदाधिकारी, अधिकारी यांचीही शाळा प्रवेशोत्सवासाठी उपस्थिती
यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे शाळा क्र. 46 येथे, शाळा क्र.18 येथे खासदार नरेश म्हस्के, शाळा क्र. 85 खर्डीपाडा दिवा येथे डॉ. श्रीकांत शिंदे, ठामपा शाळा क्र. 69 मध्ये आमदार संजय केळकर, शाळा क्र. 13 येथे, शाळा क्र. 100 येथे आमदार जितेंद्र आव्हाड, शाळा क्र. 91 येथे आमदार राजेश मोरे, आमदार ॲङ माधवी नाईक या श्रीरंग शाळा येथे, सरस्वती सेकंडरी स्कूल येथे आमदार ॲङ निरंजन डावखरे, उपमहापौर कृष्णा पाटील, शाळा क्र. 120 मध्ये सभागृह नेते हणमंत जगदाळे, शाळा क्र. 40 येथे विरोधी पक्ष नेते शानू पठाण हे उपस्थित होते. सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत गुलाबपुष्प देवून त्यांचे स्वागत करुन प्रवेशोत्सव साजरा केला. यावेळी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे देखील वाटप करण्यात आले.